सांगलीत एलसीबीची धडाकेबाज कारवाई! रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टलसह जेरबंद; देशी बनावटीचे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस जप्त
सांगलीत एलसीबीची धडाकेबाज कारवाई!रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टलसह जेरबंद; देशी बनावटीचे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस जप्त.
-------------------------------सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धडाकेबाज कारवाई करत विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली असून, याप्रकरणी गोरखनाथ मारुती कदम (वय ४२, रा. वानलेसवाडी, सांगली) याला अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील दुसरा संशयित ‘सरदार’ (पूर्ण नाव अज्ञात), रा. मध्यप्रदेश हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकाने सांगली उपविभागात पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
विश्रामबाग हद्दीतील हसनी आश्रम ते कुंभार मळा परिसरात आरोपी कमरेला पिस्टल खोचून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत नवचैतन्य प्री-प्रायमरी सीबीएसई स्कूल परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आले.
चौकशीत आरोपीने हे पिस्टल स्वतःच्या सुरक्षेसाठी सुमारे महिनाभरापूर्वी मध्यप्रदेशातील एका व्यक्तीकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचेही निष्पन्न झाले.
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता दि. १४ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह अमित परीट, संदीप पाटील, अतुल माने, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, विनायक सनदी, संकेत कानडे, अभिजीत माळकर, रोहन घस्ते, सूरज थोरात तसेच सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

No comments: