Header Ads

गुरु-शिष्य स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा

 गुरु-शिष्य स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा.

अंबप, दि. 31 मे : श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचालित अंबप हायस्कूल अंबप व अंबप गर्ल्स हायस्कूल अंबपच्या सन 2004-2005 च्या इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गुरु-शिष्य स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोकराव माने यांच्या स्मृतीस्थळास उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या स्नेहसंमेलनास तत्कालीन मुख्याध्यापक श्री. एस. वाय. जाधव व श्री. जे. टी. करंबाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सहाय्यक शिक्षक संभाजी माने, राजेंद्र शेटे, पी. डी. कुंभार, दाभाडे सर, मोरे सर तसेच सहाय्यक शिक्षिका सुतार मॅडम, मगदूम मॅडम व कामेरे मॅडम उपस्थित होत्या. शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीकांत माळी, सर्जेराव खोत, शिवाजी सुवासे व श्री. भोपळे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.

तब्बल 21 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या यशामागील शिक्षकांचे योगदान कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.संपूर्ण कार्यक्रमात आपुलकी, स्नेह व आदराचे वातावरण अनुभवायला मिळाले. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठींमुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले.या स्नेहसंमेलनामुळे गुरु-शिष्य नाते अधिक दृढ झाले असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी श्री. अमीर भिंगारे यांच्या संकल्पनेतून झाले. तसेच कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यासाठी निलेश नलवडे व शुभांगी खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज अंबपकर,प्रास्ताविक हनुमान नायकवडी ,आभार सुरेखा माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी , उमेश शिंदे, संग्राम पाटील,श्रद्धा पोवार यांचे  सहकार्य मिळाले.

No comments:

Powered by Blogger.