Header Ads

अन्नाची नासाडी म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाची विटंबना: जागतिक अन्नसुरक्षा दिनानिमित्त कौलव परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सूर

 अन्नाची नासाडी म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाची विटंबना: जागतिक अन्नसुरक्षा दिनानिमित्त कौलव परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सूर.

-----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.
------------------------------------

'अन्न हे परब्रह्म आहे' ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. अन्नधान्याचे महत्त्व समाजातील सर्व घटकांना समजावे आणि अन्नाची नासाडी थांबावी यासाठी ७ जून हा दिवस जगभरात 'जागतिक अन्नसुरक्षा दिन' म्हणून साजरा केला जातो. मात्र, सद्यस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, लग्नकार्ये आणि हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी अन्नाची नासाडी पाहून कौलव परिसरातील बळीराजाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही नासाडी म्हणजे एक प्रकारे अन्नाची आणि शेतकऱ्यांच्या घामाची प्रतारणाच आहे, असे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

आज शेतकरी राजा ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता, रक्ताचे पाणी करून शेतात रात्रंदिवस कष्ट करतो, तेव्हा कुठे लोकांच्या ताटात अन्न येते. एन उन्हाळ्यात पाण्याचे संकट, पिकांवरील रोगराई आणि वन्यजीवांचा उपद्रव सोसून शेतकरी धान्य पिकवतो. परंतु, दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी, लग्नकार्यांमध्ये केवळ प्रतिष्ठेपाई गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवले जाते आणि उरलेले अन्न थेट कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिले जाते.

या बेजबाबदार वर्तनामुळे अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. अन्नसुरक्षा दिनाचा मूळ उद्देश केवळ औपचारिकता न राहता, प्रत्येक नागरिकाने अन्नाचा प्रत्येक कण वाचवण्याची शपथ घेतली पाहिजे. अन्नाची नासाडी थांबवणे हीच खऱ्या अर्थाने राबणाऱ्या शेतकऱ्याला दिलेली मानवंदना ठरेल, अशी भावना कौलव परिसरातील शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने मांडली आहे.

No comments:

Powered by Blogger.