Header Ads

दुचाकीवरून पिस्टल घेऊन आला अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

 दुचाकीवरून पिस्टल घेऊन आला अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला...,

------------------------------
सातारा. अमर इदलकर.
-----------------------------

सातारा, दि. १५ (प्रतिनिधी) : अवैध शस्त्र विक्रीसाठी दुचाकीवरून आलेल्या एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडत मोठी कारवाई केली. आरोपीकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस आणि दुचाकीसह एकूण १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, कोरेगाव ते सातारा मार्गावरील सह्याद्री ढाबा परिसरात एक युवक गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव हद्दीतील राजधानी हॉटेल शेजारील पैलवान पानशॉपसमोर सापळा रचला.

दरम्यान, काळ्या रंगाच्या वेस्पा दुचाकीवरून आलेल्या संशयित युवकावर पोलिसांनी नजर ठेवली. योग्य संधी साधून त्याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीची गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव ओमकार दत्तात्रय कदम (वय २३, रा. रामलिंग रोड, कोरेगाव, जि. सातारा) असे आहे. त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(१), ७ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अवघ्या २३ वर्षीय युवकाकडे गावठी पिस्टल कोठून आली, तो ती कोणाला विकण्यासाठी आला होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील अवैध शस्त्र व्यवहारांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक paritosh दातिर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली

No comments:

Powered by Blogger.