Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नवीन शैक्षणिक धोरणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.

 नवीन शैक्षणिक धोरणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.

---------------------------------

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाने

---------------------------------

विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत डॉ. प्रशांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

वाई येथील जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई स्टाफ वेलफेर समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास अभ्यासक्रमावर आयोजित एक दिवसीय उजळणी वर्गास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, डॉ. हर्षद सांगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, डॉ. अंबादास सकट, श्री. भीमराव पटकुरे, डॉ. शिवाजी कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. सदर उजळणी वर्ग तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला.

डॉ. प्रशांत कुलकर्णी पुढे म्हणाले की, भारत हा तरुणांचा देश आहे व येथील तरुण विद्यार्थ्याने जर कौशल्याधारित विकास अभ्यासक्रम पूर्ण केले तर तो संपूर्ण जगामध्ये कोठेही नोकरी मिळवू शकतो. विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार आवश्यक शिक्षण देणे गरजेचे आहे. आपण जर नवीन शैक्षणिक धोरणानुसार तंत्रज्ञान व कौशल्य विकास अभ्यासक्रम स्वीकारला नाही तर आपण स्पर्धेच्या युगातून बाहेर फेकले जाऊ. त्यांनी SWOT या संकल्पनेद्वारे आपण आपल्याकडे असणारे विशेष गुण, कमतरता, संधी व धोके ओळखणे आवश्यक आहे. नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम शिकणे आवश्यक आहे. आजच्या काळामध्ये नोकरी मिळण्याच्या संधी व पात्रता बदलत चालली आहे. त्यामुळे आपण फक्त पारंपारिक शिक्षणावर अवलंबून न राहता तंत्रज्ञान व कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. आपण आपल्यामध्ये असणारे विशेष गुण व दोष शोधून त्यातून संधी निर्माण केली पाहिजे, भविष्यातील धोके लक्षात घेऊन आपण मुलांना शिक्षण दिले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी देखील सदर कौशल्य विकास अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयामध्ये अनेक कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरु करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. यासाठी त्यांनी शिक्षणक्षेत्रातील अनेक तज्ञ लोकांशी चर्चा केल्याचे सांगितले. त्यांनी पुणे विद्यापीठात येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास समितीचे प्रमुख डॉ. करमळकर यांची भेट घेऊन सदर कोर्सेस सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केल्याचेही सांगितले.

उजळणी वर्गाचे दुसरे मार्गदर्शक डॉ. हर्षद सांगळे यांनी व्यावसायिक शिक्षण ही संकल्पना सविस्तरपणे मांडली. व्यावसायिक शिक्षण ही बदलत्या काळाची गरज आहे. त्यांनी व्यावसायिक शिक्षणाचा अर्थ, उद्दिष्टे, हेतू, व्याप्ती व सद्यस्थिती सर्वासमोर मांडली. कुठल्याही व्यवसायासाठी आपल्याला जर विद्यार्थी घडवायचे असतील तर त्याला व्यावसाईक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये व्यावसायिक शिक्षण हे स्वतंत्रपणे न शिकवता ते उच्च शिक्षणातील मुख्य अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असल्याचे सांगितले. जर आपणास मुलांना व्यवसायातील योग्य संधी यायच्या असतील तर त्यांना व्यावसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे. शहरी भागात व्यावसायिक शिक्षण मोठ्या प्रमाणात सुरू केले असून ग्रामीण भागात सदर कोर्सेसची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. व्यावसायिक शिक्षण बी.ए., बी. कॉम., बी. एससी व बीसीए या पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच पूर्ण करणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणपूर्ण करतील त्यांना अनेक कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतात. तसेच हे विद्यार्थी आपला वैयक्तिक व्यवसाय देखील सुरू करू शकतात. यामुळे विद्यार्थ्याना नोकरीच्या जास्तीत जास्त संधी मिळू शकतात. सदर कौशल्यविकास अभ्यासक्रमाद्वारे झिरो डिप्लोयमेंट सुरू करता येऊ शकते. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा विद्यार्थी कौशल्यविकास अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडतो तेंव्हा तो विद्यार्थी कंपनीमध्ये रुजू झालेच्या पहिल्या दिवसापासूनच आपले काम सुरू करू शकतो. त्याला इतर कोणतेही प्रशिक्षण पूर्ण करण्याची गरज नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

मा. मदनदादा भोसले यांनी अध्यक्षीय समारोप करत असताना सदर कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व घटक नव्या उमेदीने कार्य करतील से मत व्यक्त केले. आपण सदर कोर्सेस महाविद्यालयात सुरू करून एक नवीन पर्व सुरू करत असल्याचे सांगितले. यासाठी महाविद्यालयातील प्रत्येक घटकाने एकजुटीने योगदान देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य विकास अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ ही आपल्या महाविद्यालयामध्ये रोवली जात असल्याने समाधान व्यक्त केले. आपण काळाची पावले ओळखून विद्यार्थ्याना आवश्यक असणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. आपण बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धती बदलली पाहिजे व नवीन शिक्षण पद्धतीचा आपण अवलंब केला पाहिजे. आजच्या उजळणी वर्गाने निश्चितच आपल्याला एक नवी दिशा दिली आहे. सदर कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरु करण्यामध्ये महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी श्री. प्रमोद डेरे, श्री. जितेंद्र चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले असे मत मा. मदनदादा भोसले यांनी व्यक्त केले.

स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट सूत्रसंचालन केले. तर श्री. भीमराव पटकुरे सह-स्टाफ सेक्रेटरी यांनी सदर उजळणी वर्गाचे आभार मानले. उजळणी वर्गासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments