Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाई: "महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य अवगत करणे आवश्यक आहे.

 वाई: "महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य अवगत करणे आवश्यक आहे.

-------------------------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

-------------------------------------------

 संभाषण कौशल्य प्रभावी असेल व बोलण्यात आत्मविश्वास असेल तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपल्या संभाषण कौशल्यातून आपले व्यक्तिमत्व विकसित होत असते. एखादे प्रभावी भाषण देखील आपले संपूर्ण आयुष्य बदलवू शकते. प्रभावी संभाषणाच्या जोरावर आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो." असे प्रतिपादन सिनेट सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व संभाजीराव कदम कॉलेज, देऊर येथील इंग्रजी विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक  डॉ. मनोज गुजर यांनी केले.

येथील किसन वीर  महाविद्यालयातील इंग्रजी विभाग, बी.सी.ए. विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात 'संभाषण कौशल्यावर प्रभुत्व मिळवताना' या विषयावर ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. या प्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख व बी.सी.ए. विभाग समन्वयक प्रोफेसर डॉ. सुनील सावंत, माजी प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र बकरे, डॉ. बाळासाहेब मागाडे, डॉ. अंबादास सकट, डॉ. राजेश गावित व प्रा. अर्चना कदम यांची विशेष उपस्थिती होती. 

डॉ. गुजर पुढे म्हणाले की "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी बोललेली समजते. मुले इंग्रजी व्यवस्थित लिहितात. परंतु ज्या वेळेस इंग्रजी बोलण्याची वेळ येते त्यावेळी मात्र विद्यार्थी इंग्रजी बोलण्यात कमी पडतात. यासाठी मुलांनी संभाषण कौशल्य अवगत केले पाहिजे. महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेची ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहणे व समजून घेणे ही पाच कौशल्ये  अवगत केली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य व विधायक वापर करून इंग्रजी बोलण्यास शिकले पाहिजे. त्यासाठी इंटरनेटवर अनेक प्रकारचे ॲप व वेबसाईट उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सुरुवातीस छोटी व सोपी वाक्ये बोलली पाहिजेत. इंग्रजी भाषा शिकत असताना आवाजातील चढ उतार व देहबोलीचा वापर देखील केला पाहिजे."

अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, "प्रभावी संभाषण कौशल्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. कोणतीही नोकरी प्राप्त करण्यासाठी  किंवा कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आवश्यक असते. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आपण सर्वप्रथम ती भाषा ऐकली पाहिजे, समजून घेतली पाहिजे व नंतर ती भाषा बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे."

डॉ. अंबादास सकट यांनी प्रस्तावनेत इंग्रजी भाषेचे महत्व व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. अर्चना कदम यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. रेश्माबानो मुलाणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. जयवंत खोत यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संतोष मुळीक, प्रा. संतोष चौगुले, प्रा. सचिन गरगडे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

याचबरोबर इंग्रजी विभाग व वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने "साहित्यावर आधारित चित्रपट" या विषयावर भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये इंग्रजी विभाग तसेच बी.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळी भित्तिपत्रके बनवून सहभाग घेतला. या स्पर्धेचे उदघाटन डॉ. मनोज गुजर, डॉ. रवींद्र बकरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments