Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लेखकांकडून लढण्याची प्रेरणा मिळते - डॉ. विपीन वैराट

 लेखकांकडून लढण्याची प्रेरणा मिळते - डॉ. विपीन वैराट

----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

----------------------------------------

अण्णा भाऊ साठे आणि व्यंकटेश माडगूळकर या दोन्ही लेखकांनी गरिबी प्रत्यक्ष भोगलेली होती. अण्णा भाऊंनी मुंबईला चालत जाऊन तिथे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला तर व्यंकटेश माडगूळकर यांनी आपली पहिली कथा जमीनीवर बसून लिहिली. अशा गरिबी भोगलेल्या लेखकांच्या लेखनात सामान्य माणूस स्वतःचे जीवन पाहतो. सर्वसामान्यांना या लेखकांकडून लढण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन शंकरराव जगताप महाविद्यालय, वाघोली येथील प्राध्यापक डॉ. विपीन वैराट यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत आयोजित विशेष व्याख्यान व मराठी स्वाक्षरी' स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात ते 'अण्णा भाऊ साठे आणि व्यंकटेश माडगूळकर यांची कथा' या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्र प्राचार्य प्रा. (डॉ) सुनील सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्ष होते. याप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ) ज्ञानदेव झांबरे यांची उपस्थिति होती

डॉ. वैराट म्हणाले, दोन्ही लेखकांच्या कथांमध्ये वास्तवदर्शी निसर्ग आला आहे. दोघांनाही वाचनाचा छंद असल्याने त्यांनी कल्पनेपेक्षा भेटलेल्या माणसांवर कथा लिहिल्या, सामान्य माणसांच्या भाषेत त्यांनी लेखन केल्याने ते सर्वांना जवळचे वाटतात. अशा लेखकांच्या वास्तवदर्शी लेखनाचा आस्वाद घेतल्यास आपलाही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो.

प्र प्राचार्य डॉ. सुनील सावंत म्हणाले, सदाशिवपेठी साहित्याला भेदण्याचे काम या लेखकांनी केले. या लेखकांमुळेच दलित व ग्रामीण व्यक्तिरेखांना साहित्यात स्थान मिळाले. भारतीय लोकांचे वसाहतवादात शोषण झाले. आपले स्वातंत्र्य आबाधित ठेवून देशाच्या प्रगतीत विद्यार्थ्यांनी भर टाकावी मराठी स्वाक्षरी स्पर्धा' हा अभिनव उपक्रम असून, प्रत्येकाने मराठीत स्वाक्षरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी मराठी विभागाने घेतलेल्या मराठी स्वाक्षरी स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. या उपक्रमात ६६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कु. ऋतुजा भोसले, प्रणव महागावकर, कु. सायली नवले यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर कु प्रीती मांढरे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आहे डॉ. अरुण सोनकांबळे व डॉ. संतोष चौगुले यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी केले, डॉ. धनंजय निंबाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले डॉ. अमोल कवडे व प्रा. सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments