Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूरच्या सभेत जरांगे पाटलांनी ठणकावले.

 कोल्हापूरच्या सभेत जरांगे पाटलांनी ठणकावले.

----------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

----------------------------------------------------

लपवून ठेवलेले आरक्षण आम्हाला द्या

मागील ७० वर्षांपासून लपवून ठेवलेले आरक्षण आम्हाला द्या आणि आमचा न्याय करा, हीच माझी तळमळ आहे. पुरावे सापडलेत. त्यामुळे आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. मराठांनी एकजूट ठेवावी. आता नाही तर कधीच नाही, अशा धारदार शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूरमध्ये जाहीर सभेत आपली खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचाही खरपूस समाचार घेतला. 


कोल्हापुरातील दसरा चौकात शुक्रवारी सायंकाळी जरांगे पाटलांची सभा झाली. या सभेला जिल्हाभरातून मराठा बांधव आले होते. उपस्थितांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी माझी तळमळ आहे. आता पुरावे सापडले आहेत. हे पुरावे आतापर्यंत कुणी लपवून ठेवले, याचे उत्तर आम्हाला पाहिजे. आता सापडलेल्या पुराव्याच्या आधारावर आरक्षण मिळायलाच हवे. आता गप्प बसणार नाही. पूर्वीच जर मराठ्यांना आरक्षण मिळाले असते तर मराठा समाज प्रगत जात म्हणून पुढे आला असता. आता लाखोच्या संख्येने नोंदी सापडायला लागल्या आहेत. आता त्या शांततेच्या मार्गाने पदरात पाडून घ्यायच्या आहेत.साद त्यांनी उपस्थितांना घातली. नोकरीत किंवा शिक्षणाला त्याचा फायदा होईल, त्यामुळे आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारला आपण चारी बाजूनी घेतलय. तुम्ही बेसावध राहू नका. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


मराठा माणूस लवकरच ओबीसी आरक्षणात गेला म्हणून समजा. तो निर्णय लवकरच होणार आहे. जे कोणी मराठा आरक्षणास विरोध करतात, त्यांना लवकरच उत्तर मिळेल. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत, कायदा सुव्यवस्था बिघडवणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ, पण आमच्या नादाला लागायचे नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. 


चौकट.. जरांगेचा भुजबळांवर निशाणा


 मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा रुचलेला नाही म्हणून ते मराठ्यांचा द्वेष करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजपर्यंत ते गोचीडासारखे चिकटून बसले होते. करोडोची प्रॉपर्टी मिळवलीय. म्हणून ते जेलमध्ये बेसन भाकरी खात बसले. आता तर माझ्या सासरवाडी वरच टीका करायला त्यांनी सुरूवात केले आहे. आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आवरावे, नाहीतर सरकारने तरी भूमिका स्पष्ट करावी, अशा शब्दात त्यांनी सरकारचे कान टोचले.



 चौकट..

इंचभर मागे हटणार नाही


 ७० वर्षांपासून मराठा समाजाचे वाटोळे झाले आहे. आंदोलन आणि उपोषणाच्या दणक्याने आता सरकार ते द्यायला तयारीत आहे. एक डिसेंबर पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मी आता एक इंच ही मागे हटणार नाही, असा ठाम आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करीत उपस्थितांच्या मनात विचारांची ज्योत पेटवली. व्यासपीठावर शाहू महाराज आणि संभाजी राजे यांची प्रटमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments