आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे मा. माणिकबनसोडे.
आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे मा. माणिकबनसोडे.
--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------
दि. ११: आज शेतकरी रोबोटिक शेतीकडे वळत आहे. पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस हे शेतीविषयक शब्द आता परिचित झाले आहेत. भारतीय शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन कृषी अधिकारी मा. माणिक बनसोडे यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे शेंदुरजणे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते आधुनिक शेती या विषयावर प्रबोधन पर व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्याध्यापक रामदास सूर्यवंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संजय कुंभार , प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात डॉ.अंबादास सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. बनसोडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाही. शेतीत राबण्यासाठी मजूर मिळत नाहीत. वाढती लोकसंख्या, शेतीचे तुकडीकरण, वातावरणातील चढ-उतार ह्या शेतीपुढील प्रमुख समस्या आहेत. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी. आजकाल मातीविना शेती, व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रो फार्मिंग अशा पध्दतीने शेती होत आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. रामदास सूर्यवंशी म्हणाले, कॉलेजचे सर्व विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुले आहेत. तुम्ही सर्वांनी आपल्या पालकांना शेतीत मदत करावी पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांचे कष्ट हलके करण्यास तुम्ही हातभार लावावा. श्रमातून आनंद मिळतो. अशा शिबिरातून खेड्यातील जीवन समजते. शिबिरातून मिळालेले अनुभव तुम्हाला आयुष्यभर आनंद देतील असेही त्यांनी सांगितले.
धनश्री गायकवाड हिने प्रास्ताविक केले. अर्चिता महांगडे हिने स्वागत केले. तुकाराम सोनटक्के याने पाहुण्यांची ओळख करून दिली. स्मृती मोहिते हिने सूत्रसंचालन केले. सिध्दी पोळ हिने आभार मानले. अश्विनी चराटे हिने कार्यक्रमाचे संयोजन केले.
कार्यक्रमास जयवंत पवार, राजश्री कांबळे, निकिता सुर्वे, सुनील दगडे, चेतन तावरे, शेंदुरजणे गावातील ग्रामस्थ व एन.एस.एसचे स्वयंसेवक उपस्थित होते.
Comments
Post a Comment