Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती.

 आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती.

 बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी पोंभुरले येथे झाला. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर हे लहानपणापासून हुशार होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी मराठी आणि संस्कृत विषयाचे अध्ययन पूर्ण केले. नंतर ते मुंबईला गेला तिथे त्यांनी इंग्रजी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी विषयात देखील त्यांनी नैपुण्य मिळवले. इंग्रजीतील त्यांचे नैपुण्य पाहून इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यांची एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्या कॉलेजमध्ये एकूण सतरा प्राध्यापक होते त्यात बाळशास्त्री जांभेकर हे एकमेव मराठी प्राध्यापक होते. दादाभाई नौरोजी हे त्यांचेच विद्यार्थी होते. पुढे त्यांची नेमणूक शाळा तपासणीस म्हणून झाली. बोर्ड ऑफ एज्युकेशनने चांगले अध्यापक तयार करावेत अशी सूचना त्यांनी इंग्रज सरकारला केली ती सूचना मान्य करून इंग्रज सरकारने डीएड, बीएड कॉलेजची निर्मिती केली. ते शिक्षणाबाबत जितके आग्रही होते तितकेच ते सामाजिक सुधारणे बाबत आग्रही होते. केवळ शिक्षणाचा प्रसार करून चालणार नाही तर सनातनी आणि प्रतिगामी लोकांच्या मनावर बेगडी श्रद्धांचा जो कालबाह्य पगडा आहे तो हटवला पाहिजे. लोकांच्या भावना, संवेदना विशाल उदार झाल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते त्याकरिता त्यांनी दर्पण नावाचे पहिले वर्तमानपत्र सुरू केले. दर्पणचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित झाला. दर्पण हे द्विभाषिक वर्तमानपत्र होते. एकाच वेळी इंगजी व मराठीत निघणाऱ्या या वर्तमानपत्राच्या पानातील दोन स्तंभात डावीकडचा स्तंभ इंग्रजी भाषेत तर उजवीकडच्या स्तंभात मराठी भाषांतर असे त्यात एकूण आठ पाने असत. जांभेकर यांनी वाचकांची मागणी वाढू लागल्याने दर्पण साप्ताहिक ४ मे १८३२ पासून सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर हे निर्भीड पत्रकार होते. त्यांचे लेख विचारप्रवर्तक असत. इंग्रजांच्या नोकरीत असूनही ते इंग्रज सरकार विरुद्ध बेधडक लिहायचे त्याचप्रमाणे जातपात, कर्मकांड, अनिष्ट रूढी परंपरा यावर ते आपल्या लेखणीतून सातत्याने प्रहार करीत. ६ जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस आणि योगायोगाने ६ जानेवारी रोजीच दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला असल्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना विविध संस्थांकडून गौरविले जाते. त्यांचा सन्मान केला जातो. १८ मे १८४६ रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचे निधन झाले. जयंतीदिनी बाळशास्त्री जांभेकरांना विनम्र अभिवादन! तसेच पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना मनापासून शुभेच्छा!  

  श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

Post a Comment

0 Comments