एन एस एस मन आणि मेंदू सशक्त करण्याचे ठिकाण.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
मा. वैशाली जायगुडे बोलताना, नायब तहसिलदार वैशाली जायगुडे, व्यासपीठावर प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, सरपंच रेखा जगताप, उपसरपंच जयसिंग जगताप व इतर मान्यवर.
वाई दि.१४ राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांतून श्रमाचे महत्त्व समजते. व्यक्तिमत्त्व विकास होतो. मी किसन वीरची माजी विद्यार्थिनी आहे. माझे व्यक्तिमत्त्व घडले क्रीडा व एन एस एस विभागांमुळे. आपल्या भोवतालचे वातावरण आपल्याला घडवत असते. एन एस एस तर मन आणि मेंदू सशक्त करण्याचे ठिकाण आहे असे प्रतिपादन नायब तहसिलदार वैशाली जायगुडे यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे शेंदुरजणे येथील शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी सरपंच रेखा जगताप, उपसरपंच जयसिंग जगताप, कला विभागाचे उपप्राचार्य व एन.एस.एस.चे सल्लागार प्रा. डॉ. सुनील सावंत व डॉ. चंद्रकांत कांबळे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे. ग्रामस्थ संजय रामचंद्र जाधव, महादेव मांढरे, दत्तात्रय जगताप, युवराज जगताप, संदीप जगताप, तुकाराम जाधव, राहुल जगताप यांची उपस्थिती होती.
जायगुडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपला विकास साधावा. स्पर्धेत टिकण्यासाठी अवांतर वाचन करावे. गावातील शिबिरांमुळे ग्रामीण जीवन समजते. खेड्यातील लोकांकडे जिव्हाळा आहे. ते मदतीसाठी तत्पर असतात. आपल्यालाही ग्रामीण जीवन जगण्याची संधी मिळते.
माजी सरपंच सुरेश जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष विजय गायकवाड, संजय भिकू जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, राष्ट्रभावना स्वतःत रुजविण्याची कार्यशाळा म्हणजे एन एस एस होय. कोणतेही काम चांगले वाईट नसून ते आपण कसे करतो हे महत्त्वाचे असते. या गावाचे पूर्ण सहकार्य मिळाले. त्यांचा राजकारण विरहित काम करण्याचा विचार आपण घेऊन जाऊया. तुम्हीही गावात बंधारा बांधून तुमच्या कामाची आठवण त्यांच्यासाठी ठेवून निघाला आहात. अशा शिबिरातून गावाशी प्रेमाचे नाते जोडले जाते, ही शिबिराची फलश्रुती आहे.
शिबिरार्थी विद्यार्थी प्राची जगताप, ओमकार वाडकर, ओंकार बोबडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात एन.एस.एस. गीत सादर करून झाली.
कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरुण सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमास कॅ. डॉ. समीर पवार, सुनील दगडे, चेतन तावरे, ग्रामस्थ व एन.एस.एस.चे स्वयंसेवक यांची उपस्थिती होती.
0 Comments