साताऱ्याची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------------
(शरदचंद्र पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांचे तक्रार)
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा दि १० पासून कोलमडल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे यामुळे येथे एकच खळबळ उडाली. याची दखल घेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आज दिवसभर ही यंत्रणा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
सातारा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी ६३.७ टक्के मतदान झाले. १८ लाख मतदारांपैकी ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . या निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणात असून प्रमुख लढत भाजपचे उदयनराजे भोसले आणि शशीकांत शिंदे यांच्यात आहे. झालेल्या मतदानाच्या विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशिन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन एमआयडीसी सातारा येथील गोदामात सुरक्षित ठेवल्या आहेत. त्या मशिसच्या सुरक्षितेसाठी पोलीस यंत्रणेबरोबरच स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा आहेत. मात्र दि १० रोजी सकाळपासून सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची बाब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रतिनिधी राजकुमार पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सीसीटीव्हीचा ठेकेदारस कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मतदान प्रक्रियेची सर्व ईव्हीएम मशिन्स या गोदामात सुरक्षित ठेवल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या काही प्रतिनिधींना सांगितले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेने त्याठिकाची तपासणी केली असता गोदामामध्ये संरक्षणासाठी पोलीस व स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी राजकुमार पाटील यांनी सीसीटीव्ही यंत्रणा व त्याची लिंक दि. १० रोजी सकाळपासून वारंवार बंद दिसत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. ईव्हीएम मशिनच्या संरक्षणासाठी बसवलेच्या सीसीटीव्हीची लिंक ही उमेदवार व त्यांच्या उमेदवार प्रतिनिधींना दिलेली आहे. ही लिंक दि. १० रोजीच्या सकाळपासून गोडावून परिसरातील सीसीटीव्ही कव्हरेज बंद दिसत आहे. त्याची तक्रार करण्यात आली. त्याच तक्रारीची दखल सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेवून लगेच संबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवार दि. ११ रोजी दिवसभर त्याच तक्रारीच्या अनुषंगाने गोदाम परिसरात कार्यवाही सुरु होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी सिद्धीविनायक सिक्युरिटी सिस्टिम लि चे ठेकेदार मनेषकुमार गणेशलाल सारडा यास बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, गोदाम परिसरातील सीसीटीव्ही कव्हरेज दि. १० च्या सकाळपासून बंद दिसत असल्याने आपले लोकसभा निवडणूकी च्या अनुषंगाने सीसीटीव्ही पुरवठा केलेले संपूर्ण देयक आपणास अदा करण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी. तसेच यंत्रणा तत्काळ कार्यान्वित न केल्यास आपणास काळया यादीत टाकले जाईल. आपली अनामत रक्कम जप्त केली जाईल याची नोंद घ्यावी. तसेच मतमोजणी होईपर्यंत आपण स्वत: सदर ठिकाणी हजर रहावे. आपणाला गोदाम सोडून कोठे जायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, तरी जिल्हा मार्केटींग फेडरेशन गोदाम एमआयडीसी सातारा येथील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने योग्य रितीने चालू करण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या असून ही नोटीस आज दि.११ मे रोजी दिलेली आहे.
ईव्हीएम मशिनवरुन सतत आरोप प्रत्यारोप होत असताना व आंदोलने होत असताना ईव्हीएम मशिनमध्ये कोणताही फेरफार करता येत नाही. सुरक्षित मतदान करता येते असे निवडणूक आयोगाकडून प्रचार आणि प्रबोधन करण्यात आले होते. मात्र साताऱ्यातच येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
0 Comments