Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. मे. पुं. रेगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाईतील किसन वीर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न.

 प्रा. मे. पुं. रेगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाईतील किसन वीर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाणे 

------------------------------------

वाई : ‘भारतीय तत्त्वज्ञानातील मे. पुं. रेगे यांचे कर्तृत्व मोठे असून कृतिशील तत्त्वज्ञ आणि विचारवंत म्हणून त्यांचे कार्य महाराष्ट्रीय प्रबोधनात श्रेष्ठतर ठरते’, असे प्रतिपादन तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रदीप गोखले यांनी केले. मराठी विश्वकोशाचे माजी अध्यक्ष प्रा. मे. पुं. रेगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाईतील किसन वीर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश सिरसट होते. वाङ्मय मंडळ व अंतर्गत दर्जा हमी कक्ष किसन वीर महाविद्यालय वाई, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान वाई आणि प्रागतिक इतिहास संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वचिंतन आणि समाजचिंतन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, तर्कतीर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पंडित टापरे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. गोखले म्हणाले, भारतीय तत्त्वज्ञानाचे विवेचन करताना रेगे यांनी कोणत्याही दर्शनांचे समर्थन केले नाही. त्यांनी हिंदुधर्मपरंपरेसमोरील वैचारिक आव्हानांची चिकित्सा केली, तसेच सुधारणावादी विचारांचाही परामर्श घेऊन भारतीय समाजव्यवस्थेतील प्रश्नांना तात्त्विक पातळीवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. रेगे यांनी भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञ यांच्यात घडवून आणलेला पूर्व पश्चिम संवाद हा महत्त्वपूर्ण होता, असेही ते म्हणाले. 

पहिल्या सत्रात डॉ. हरीश नवले यांनी रेगे यांचे उपयुक्ततावादी तत्त्वज्ञान सांगून तत्त्वज्ञानात आविष्कारवादाचा अभ्यास आधुनिक काळात झाला पाहिजे, असे मत मांडले. रेगे यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञांच्या विचारांची केलेली चिकित्सा उद्बोधक असून भारतीय परंपरेतील स्वातंत्र्य, समता या मध्यवर्ती कल्पनेत ‘स्व’चा विचार असल्याचे डॉ. शरद बाविस्कर यांनी प्रतिपादन केले. डॉ. दीप्ती गंगावणे यांनी धर्म आणि धार्मिक अनुभूती यांतील रेगेंनी उलगडून दाखविलेली तार्किक फेरसंगती आजच्या काळातही पथदर्शी असल्याचे सांगितले. 

दुसऱ्या सत्रात डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आधुनिक काळात काही प्रवृत्तींकडून प्रबोधनाचा पराजय करण्याकडे कल दिसून येतो ही चिंतेची बाब असून रेगे यांचे तत्त्वविचार सध्याच्या विभाजनवादी विचारव्यवहारावर मात करतील, असा विश्वास व्यक्त केला. तर स्वतःचे तत्त्वज्ञान स्वतः निर्माण करणारे रेगे यांनी देशाला नवीन विचारसरणी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तत्त्वविचारांवर बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता, असे सतीश बनसोडे म्हणाले. डॉ. उमेश बगाडे यांनी स्वातंत्र्यविषयक कल्पना समजून घ्यायची असेल तर रेगे यांच्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत रेगे यांच्या मूलगामी तत्त्वज्ञानाची चिकित्सा करताना त्यांच्या समाजचिंतनातील मर्यादाही त्यांनी जोरसकसपणे उलगडून दाखविल्या. समाजचिंतनाची जबाबदारी नव्या पिढीने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

तिसऱ्या सत्रात प्रा. सचिन गरुड यांनी कोणत्याही तत्त्वज्ञानाला काळाचा संदर्भ असला तरी ते तत्त्वज्ञान सामाजिक संघर्षात तयार होत असते, असे मत मांडून तत्त्वज्ञानात धर्म, जाती, वंश, पुरुष यांवर होणाऱ्या विवेचनात स्पष्टता असावी, असे मत मांडले. तत्त्वज्ञानाच्या अंगाने रेगे यांनी सौंदर्यशास्त्राची उकल करून गहन विषय सोप्या भाषेत मांडले, तसेच रस्त्यावरच्या लढाईत प्रत्यक्ष उतरणारे रेगे हे तत्त्वज्ञ कार्यकर्ते होते, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद मालशे यांनी समारोपप्रसंगी केले. यावेळी डॉ. चित्रा-रेगे दाभोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सरोजकुमार मिठारी यांनी प्रास्ताविक तर डॉ. अरुण सोनकांबळे, डॉ. रेश्माबानो मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. आभार रवींद्र घोडराज यांनी मानले. यावेळी प्रा. रामप्रसाद तौर, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, सुरेश यादव, दत्तात्रय वाघचवरे आदींसह महाराष्ट्रभरातील अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. सुनील सावंत, प्रा. डॉ. भानुदास आगेडकर, डॉ. चंद्रकांत कांबळे, सौ. दिक्षा मोरे व डॉ. शिवाजी कांबळे यांनी संयोजन केले.

Post a Comment

0 Comments