जागतिक वन दिवस व चिमणी दिवस साजरा
जागतिक वन दिवस व चिमणी दिवस साजरा.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी.
रणजीत ठाकूर
--------------------------------------
स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 21 मार्च रोजी संयुक्त रित्या चिमणी दिवस व जागतिक वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय देशमुख हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वन विभाग कार्यालयाचे वनपाल विष्णू जटाळे, वनपाल निर्जला डिघोळे, वनरक्षक जयश्री लोखंडे, वनरक्षक अश्विनी मोटघरे, ज्येष्ठ शिक्षक खुशाल राठोड, ज्येष्ठ शिक्षिका शोभा राऊत तसेच शिवाजी प्राथमिक उर्दूचे मुख्याध्यापक अनिस खान हे मंचावर उपस्थित होते.
चिमणीला उन्हाळ्यात पाणी मिळावं याकरीता प्राचार्य संजय देशमुख व शाळेतील हरितसेना विभाग प्रमुख विठ्ठल सरनाईक यांच्यावतीने प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना 40 जलपात्र वितरित करण्यात आले.
आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये चिमणी सारखा पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्याचे संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चिमणी तसेच इतर पक्षी जे आपल्या परिसरात येतात त्या पक्षांना पाणी व अन्नपूरविण्याची सर्वस्व जबाबदारी आपली असल्याचे महत्व पटविणारे मार्गदर्शन विठ्ठल सरनाईक यांनी केले. वनपाल निर्जला डिघोळे यांनी विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व सांगताना कोरोना सारख्या महामारीच्या काळात कशाप्रकारे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता, कृत्रिम ऑक्सिजन ची आवश्यकता लोकांना पडत होती, मात्र सगळीकडे वृक्ष मुबलक प्रमाणात असते तर कदाचित ही अडचण निर्माण झाली नसती, त्याचबरोबर मानव जन्मापासून मृत्यूपर्यंत वृक्षांवर कसा अवलंबून असतो याचे महत्त्व विशद करणारे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संजय देशमुख यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी एक वृक्ष लावावे व त्या वृक्षाचे जतन करावे तसेच तुम्हाला चिमणी दिनाच्या निमित्ताने देण्यात आलेले जलपात्र आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या वृक्षांना टांगून त्यामध्ये नित्यनियमाने पाणी टाकावे व शक्य झाल्यास तिथे येणाऱ्या पक्षांना खाद्यही टाकावे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे शाळेच्या परिसरात लावलेल्या वृक्षांचे संवर्धन विद्यार्थ्यांनी करावे, आपण शाळेमध्ये येताना पिण्यासाठी जे पाणी आणतो त्या पाण्याचा अपव्यय न करता शिल्लक राहिलेले पाणी रस्त्यावर दिसलेल्या वृक्षाला घालावे जेणेकरून रखरखत्या उन्हातही त्या वृक्षांचे संवर्धन होईल असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. पुढे बोलताना प्राचार्य संजय देशमुख यांनी जागतिक वन दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना आज रोजी जंगलाची होत असलेली कत्तल, त्यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास या विदारक बाबी विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट करून सांगितल्या. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.विजय देशमुख यांनी केले.
Comments
Post a Comment