परगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन.
परगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन.
------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------------
जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुढील 15 दिवस नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार.
*कोल्हापूर, दि.17* : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदान दि.7 मे रोजी होणार असून मतदार यादीत नाव असणाऱ्या मात्र कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या मतदारांनी आपल्या स्वगावी येवून मतदानाचा हक्क बजावावा. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया सुरू असून सुट्टीबरोबर लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांनी आवाहन केले आहे. कोल्हापूर जिल्हयाच्या मतदान टक्केवारीत यावर्षी सर्व मतदार मतदान करून लक्षणीय वाढ नोंदवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील तयारीबाबत नोडल अधिकारी यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस., हातकणंगले निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, अपर जिल्हाधिकारी श्रीम. किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मतदार जनजागृतीबाबत स्वीप समितीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी याबाबत कामकाज पाहणारे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस. यांनी पुढिल 15 दिवसांचे नियोजन सांगितले. यामधे मतदार पालकांना विद्यार्थ्यांकडून देण्यात येणारे पत्र, मतदार जनजागृती रॅली, कमी मतदान टक्केवारी असलेल्या गावांमधील विशेष कार्यक्रम, जिल्हास्तरावरील मतदार आयकॉन मार्फत करावयाची जनजागृती, प्रमुख शहरांमधील विविध कार्यक्रमांसह विविध माध्यमांमधून करावयाचे उपक्रम याबाबत नियोजन करण्यात आले. या कामांसह प्रशिक्षणादरम्यान आता कर्मचाऱ्यांना ई-प्रशिक्षण साहित्य निर्माण करून देण्याच्या सूचनाही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.येडगे यांनी दिल्या. इव्हीएम बाबत सुरक्षा व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी. मत मोजणीच्या ठिकाणी सर्व स्वच्छता करून आवश्यक नामफलक लावावेत याबाबतच्याही सूचना संबंधितांना यावेळी त्यांनी दिल्या.
याबरोबर मतदान केंद्र निहाय आवश्यक किमान सोयीसुविधा तसेच ईव्हीएमबाबत सुरक्षा, निवडणूक साहित्य आदी बाबत नोडल अधिकारी यांनी माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे रॅण्डमायझेशन 20 एप्रिलला तर दुसरे प्रशिक्षण 26-27 एप्रिलला होणार आहे. यावेळीच्या मतदानाअगोदर सर्व मतदारांना निवडणूक विभागाकडून मतदान स्लीप वाटप करण्यात येणार आहेत. दिव्यांग व 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना घरपोच मतदान सुविधा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे अतिरीक्त मनुष्यबळ नेमण्यात येणार आहे. या अनुषंगिक आवश्यक साहित्य व दळणवळणाच्या सुविधा वेळेत देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सध्या उन्हाळा तीव्र होत असून दुपारचे तापमान वाढत आहे. याचा परिणाम मतदान केंद्र ठिकाणी आलेल्या मतदारांवर व सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर होवू नये म्हणून सर्व प्रशिक्षण ठिकाणी निवारा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. क्षेत्रियस्तरावर काम करणाऱ्या व वेगवेगळ्या फिरत्या पथकांसाठी आवश्यकता पडल्यास रूग्णवाहिका व स्थानिक रूग्णालयात आवश्यक सुविधा असल्याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिले.
**
Comments
Post a Comment