Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

इंग्रजी भाषेच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रो. डॉ. सुनिता घार्गे सेवानिवृत्त.

 इंग्रजी भाषेच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रो. डॉ. सुनिता घार्गे सेवानिवृत्त.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा प्रतिनिधी 

--------------------------

अनिल वीर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील कला शाखेच्या उपप्राचार्या इंग्रजी विभागप्रमुख प्रो. डॉ. सुनिता घार्गे  या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्या आहेत.तेव्हा महिला महाविद्यालयात सेवक कल्याण समिती व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्ती कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 

        या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व महाराष्ट्र शासनाच्या नियोजन मंडळातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक ए. एम. जाधव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. प्रा. सुनिल घार्गे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रो.डॉ. एस. एस.पवार,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. जयश्री आफळे, सेवक कल्याण समितीचे प्रमुख प्रो. डॉ. संजीव बोडखे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रकाश टोणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                ए.एम.जाधव म्हणाले, "समर्पित वृत्तीने आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या प्रो. डॉ. सुनिता घार्गे या केवळ शिक्षिका नव्हेत. त्या समाज शिक्षिका आहेत. त्यांनी त्यांच्या सेवाकाळात आपल्या कामातून वेगळा ठसा उमटविला आहे. त्या जरी सेवानिवृत्त होत असल्या तरी लेखन, संशोधन आणि नव्या पिढीला मार्गदर्शन हे त्यांचे उपक्रम अखंड चालू राहतील."

      अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मेनकुदळे म्हणाले, "प्रो.डॉ.सुनिता घार्गे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये अत्यंत उत्कृष्ट सेवा बजावली होती. हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले.संस्था व विविध महाविद्यालयांच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शासकीय नियमानुसार त्या निवृत्त होत असल्या तरी महाविद्यालयाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध पुढील काळातही असेच वृद्धिंगत होत राहतील. खरा लोकशिक्षक कधीच निवृत्त होत नाही." 

  प्रो.डॉ.सुनिता घार्गे व प्रा. सुनिल घार्गे या उभयतांचा स्मृतिचिन्ह, ग्रंथ व रयत शिक्षण संस्थेचे चांदीचे बोधचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रो. डॉ. सुनिता घार्गे यांनी माणदेशातील आपल्या गोंदवले परिसराचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. रयत शिक्षण संस्था, दहिवडी महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कॉलेज या प्रांगणातील त्यांच्या सेवाकाळाला उजाळा दिला. एक कृतार्थ जीवन जगत असल्याचे समाधानही त्यांनी बोलून दाखवले.सेवानिवृत्ती निमित्त सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाला त्यांनी पंचवीस हजार रुपये देणगी दिली. प्रो.डॉ. सुनिता घार्गे यांच्या कार्याबद्दल अनेकांनी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली. या समारंभास घार्गे यांचे विद्यार्थी, स्नेही व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.कु.श्रेया ढेंबरे,डॉ.मनीषा पाटील, प्रा. किशोर सुतार, छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उपप्राचार्य प्रो.डॉ. रोशन आरा शेख,डॉ. जयश्री आफळे आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली.प्रो.डॉ.सुनिता घार्गे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये अडतीस वर्षे अध्यापनाचे कार्य केले आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील इंग्रजी विषयाच्या व्यासंगी अभ्यासक व संशोधक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. अध्यापनाबरोबरच विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावरील चर्चासत्रे, कार्यशाळांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजनही त्यांनी केले होते. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळे, विविध समित्यांवर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याबद्दल त्यांना विविध सामाजिक व शैक्षणिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ग्रंथ लेखन व संपादन कार्यातही त्यांनी ठसा उमटविला आहे.प्रो.डॉ.संजीव बोडखे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. प्रकाश टोणे यांनी मानले. प्रा. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले.


फोटो : उपप्राचार्या सौ.व श्री.घार्गे यांचा सत्कार करताना प्राचार्य मेनकुदळे शेजारी मान्यवर.(छाया-अनिल वीर)

Post a Comment

0 Comments