शिवाजी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा...!
शिवाजी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा...!
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
--------------------------------
येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दि.1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मंचावर प्राचार्य संजयराव देशमुख, उपप्राचार्य संजयराव नरवाडे, शिक्षक प्रतिनिधी खुशालराव राठोड, ज्येष्ठ प्राध्यापक अरुण लिमजे, मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिनराव देशमुख, उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिस खान, ज्येष्ठ शिक्षिका कविता चव्हाण व खुर्शिद बानो हे उपस्थित होते. मंचावरील उपस्थितांचा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य संजयराव देशमुख म्हणाले की पूर्वीच्या संयुक्त महाराष्ट्रातून एक मे 1960 रोजी महाराष्ट्र वेगळा झाला आणि तेव्हापासून दरवर्षी एक मे ला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मोठ्या संघर्षाचा वारसा आहे, यासाठी अनेक भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करलंय, त्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. विकासाच्या बाबतीत अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर नागपूर ही राज्याची उपराजधानी म्हणून ओळखली जाते ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची आहे, तसेच या दिवशी आपण कामगार दिन म्हणूनही साजरा करतो, या दिनाचे महत्त्व सांगताना प्राचार्य देशमुख म्हणाले की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामगाराच्या तळहातावर तरलेली आहे असे सांगणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आठवण निश्चितच आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या आर्थिक विकासामध्ये कामगाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, म्हणूनच कामगाराच्या कार्याचा गौरव म्हणून आजचा हा दिन कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.
त्यानंतर वर्ग पाचवी ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाटप यावेळी करण्यात आले. त्यासाठी विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.विजय देशमुख यांनी केले तर आभार डिगांबर पाचरणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment