Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तिसऱ्या टप्प्यातील लातूर राखीव लोकसभा मतदासंघांसाठी आज मतदान; यंत्रणा सज्ज.

 तिसऱ्या टप्प्यातील लातूर राखीव लोकसभा मतदासंघांसाठी आज मतदान; यंत्रणा सज्ज.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

----------------------------------

               तिसऱ्या टप्प्यासाठी आज मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून लातूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ईव्हीएम मशीन यंत्र मतदान केंद्रावर घेवून जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेस व खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर तीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

               लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात लातूर लोकसभेची निवडणूक होत असून एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेस पक्षात होत असल्याचे चित्र आहे. लातूर लोकसभेत सीमावर्ती भाग हा नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण २ लाख ९१ हजार ६८ मतदारसंख्या आहे. तर ३३० मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ३ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन यंत्र पाठविण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच खाजगी वाहने लावण्यात आली आहेत. त्यापैकी कदमाचीवाडी, कांजाळा तांडा व नांदगाव असे तीन मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली असून त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूक विभागाकडून मतदारांना मतदान केंद्राकडे आकर्षित करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लोहा शहरातील जि. प. हायस्कूल येथे युनिक मतदान केंद्र, तालुक्यातील पारडी येथे दिव्यांग मतदान केंद्र, कंधार येथे सखी व युवा मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. अशी माहिती लोह्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.

          यापूर्वीच दिव्यांग तसेच ८५ वर्षांवरील मतदारांना त्यांच्या घरीच जाऊन मतपत्रिकेद्वारे गुप्तपणे मतदान घेण्यात आले. लोहा तहसील कार्यालयातून लोहा-कंधार तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात ईव्हीएम मशीन यंत्र रवाना करण्यात आले. 

           निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वितेसाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरूणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोह्याचे तहसिलदार विठ्ठल परळीकर, कंधारचे तहसिलदार रामेश्वर गोरे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संजय भोसीकर, राजेश पाठक, अशोक मोकले, रेखा चामनार आदी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments