Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

 किसन वीर महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

----------------------------------------------

वाई: नियमित व्यायाम व संतुलित आहार घेतल्याने मधुमेह आजारापासून दूर राहता येते. मधुमेह हा दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे. आपण योग्य वेळी तपासणी करून औषधोपचार केले तर आपणास आरोग्यदायी जीवन जगता येते, असे प्रतिपादन साताऱ्यातील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉक्टर दीपांजली पवार यांनी केले

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात स्टाफ वेलफेअर समिती, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व डायबिटीस स्पेशालिटी क्लीनिक रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून मधुमेह लक्षणे व उपाय या विषयावर त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्रा. डॉ. सुनील सावंत डॉ. चंद्रकांत कांबळे प्रा. डॉ. विनोद वीर डॉ. मंजुषा इंगवले डॉ. अंबादास सकट डॉ. संग्राम थोरात यांची विशेष उपस्थिती होती.

पवार पुढे म्हणाल्या, मानसिक ताणतणाव, बदलती जीवनशैली व तळलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने मधुमेह रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह अनुवंशीक आहे. तसेच तणावग्रस्त लोकांना लवकर मधुमेह होतो. मधुमेहाचे टाईप १ व टाईप २ असे प्रकार असतात. मधुमेहाची लक्षणे एकाएकी लक्षात येत नाहीत. परंतु सतत तहान लागणे, थकवा येणे, वजन घटणे, तीव्र भूक लागणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटून रक्तातील साखर तपासून घ्यावी.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. तसेच मधुमेही लोकांनी पौष्टिक फायबरयुक्त आहार व पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. जास्त गोड, तिखट मसालेदार, आंबट पदार्थ खाऊ नयेत.

डॉ. संजीवनी कद्दू यांनी देखील आपल्या मनोगतात मधुमेहाची माहिती देवून त्याची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता हॉस्पिटलला भेट देऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षकांनी प्रश्न विचारले व त्यास पवार यांनी समर्पक उत्तरे दिली.

अध्यक्ष स्थानावर बोलताना प्राचार्य फगरे म्हणाले मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे माणसाने नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे. तसेच नियमित व्यायाम व योगासने करणे आवश्यक आहे. मधुमेह आजारावर वेळीच उपाय केले नाहीत तर त्याचे दुरगामी व गंभीर परिणाम होतात. त्यांनी आपल्या अनुभवातून जवळच्या व्यक्तींचे मधुमेह आजाराचे पथ्य पाळून मधुमेहावर नियंत्रण ठेवल्याची उदाहरणे दिली. तसेच तज्ज्ञ लोकांकडून नियमित तपासण्या करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

व्याख्यानानंतर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. आरोग्य विषयक तपासणीसाठी डॉ. सुबोध शेळके, संतोष हराळे, विशाल मोहिते, उमेश शेवाळे नाझिया बागवान व जमीर इनामदार आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी जयवंत खोत, संतोष मुळीक सचिन गरगडे व जितेंद्र चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरुण सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments