Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मित्र-मैत्रिणी आरशासारख्या असाव्यात - डॉ. सुरभी भोसले.

 मित्र-मैत्रिणी आरशासारख्या असाव्यात - डॉ. सुरभी भोसले.

---------------------------------------

वाई प्रतीनीधी

कमलेश ढेकाणे

---------------------------------------

वाई:-महाविद्यालयीन जीवनात मित्र-मैत्रिणींच्या सहवासाचा लाभ पुढे आयुष्यभर होत राहतो. त्यामुळे मित्र-मैत्रिणींना जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या मित्र-मैत्रिणी आरशासारख्या असाव्यात असे प्रतिपादन डॉ. सुरभी भोसले यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण कक्ष व अंतर्गत तक्रार समितीच्या उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. महिला सक्षमीकरण कक्षाच्या समन्वयक डॉ. मंजुषा इंगवले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डॉ. भोसले पुढे म्हणाल्या, कॉलेजमधील समोर बसलेल्या विद्यार्थिनी ह्या स्वतःचा विचार तयार करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. शिक्षणाबरोबरच आपल्या मधील आत्मविश्वास वाढवायचा असेल तर, व्यायाम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपल्या मित्र-मैत्रिणी, परिवार, जोपासलेले छंद, निवडलेले मार्ग, पैशाची बचत, प्रेम, एकमेकांतील तुलना, स्पर्धा व अवास्तव अपेक्षा असे दहा घटक महिलांच्या सक्षमीकरणासाठी परिणामकारक ठरतात असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, महिला सक्षम आहेतच. त्यांना ती देणगी निसर्गत:च लाभलेली आहे. शिक्षण व ज्ञानार्जनाबरोबरच विद्यार्थिनींनी कला कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत व समाजात एक आदर्श स्थान मिळवले पाहिजे. महाविद्यालयात सुरू होणाऱ्या विविध कौशल्याधारित कोर्सचा लाभ विद्यार्थिंनींनी घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील सेट पास झालेल्या मनीषा शेवाळे, दीक्षा मोरे, सुमन बोडरे, नेहा सावंत व विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केलेल्या डॉ. दीपिका माने यांचा डॉ. सुरभी भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महाविद्यालयात नव्याने रुजू झालेल्या प्राध्यापिकांचे स्वागत करण्यात आले.

डॉ मंजुषा इंगवले यांनी प्रास्ताविक केले. राजेश्वरी कामटे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. नीलम भोसले यांनी आभार मानले, कोमल बाबर व पौर्णिमा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी दिपाली चव्हाण, दिपाली पिसाळ, वासंती सूर्यवंशी व रेश्मा मुलानी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments