Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्राथमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, अद्याप विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित.

 प्राथमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, अद्याप विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित.

सातारा जिल्ह्यातील नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. पहिली घटक चाचणी तोंडावर आली असताना पुस्तकांचा पत्ता नसल्याने प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर पुन्हा एकदा आला आहे. पाठ्यपुस्तके व गणवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकही नाराज आहेत.  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे धोरण आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी, अनुदानित अशा जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जातो. पुस्तकांची मागणी ही प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांनी ऑनलाईन पद्धतीने बालभारती कडे केली होती. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा निर्णय घेतला होता परंतु अद्याप शाळा सुरू होऊनही तीन महिने झाले तरी अजून पुस्तके मिळाली नसल्याने अभ्यास कसा करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. पालकांनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा ? पाठ्यपुस्तकाबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही . नेमकं प्राथमिक शिक्षण विभाग काय करतंय हा प्रश्न अनुत्तरीत आहे. गणवेश, एक जोडी बुट व दोन पायमोजे यासाठी समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभागाचे वतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे.हा निधी शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग केला आहे. 15 ऑगस्ट रोजी तरी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश,बुट व पायमोजे मिळतील अशी अपेक्षा होती परंतु या मोफत गणवेश योजनेचा बोजवारा उडाला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर नक्की काय करतात. याबाबत त्यांनी लक्ष घालावे अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. पाहुया प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर याबाबत काय निर्णय घेतात.

Post a Comment

0 Comments