Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मानवतेचा देव्हारा.

 मानवतेचा देव्हारा.

--------------------------------

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे

--------------------------------

वाई तालुक्यातील भुईंजच्या मातीत कृष्णेकाठी जन्मलेल्या भाऊंची यशस्वी राजकीय वाटचाल (भुईंज ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य ते महाराष्ट्र विधानसभा सदस्य व मंत्री तसेच भारताच्या संसदेचे सदस्य) तर सर्वज्ञात आहेच; तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू म्हणजे त्यांना शेतकऱ्यांच्याविषयी कळवळा आहे. त्यामुळेच राजकारणाच्या माध्यमातून मोठी मोठी पदे भूषविलेली ही व्यक्ती सर्वांचा त्याग करून सहजच आपल्या गावाशी एकरूप होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भुईंजचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे. एकदा भुईंज गावचे सुपुत्र आयएफएस अधिकारी कै. राजेश स्वामी व माजी पर्यावरणमंत्री जयराम रमेश दिल्लीमध्ये एकत्र बसले असताना मंत्रीजी स्वामींना म्हणाले, 'आप कौनसे गांवके है?' स्वामी म्हणाले, 'मै महाराष्ट्रसे आया हूं, और मेरा गांव सातारा जिलेमे आता है। गावका नाम है भुईंज ।' भुईंजचे नाव ऐकताच जयराम रमेश म्हणाले 'तो आप भाऊके गांवके हैं।' असे आपले सर्वांचे लाडके भाऊ गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. खरंतर भाऊ राष्ट्रपती पदाच्या तोडीचे आहेत; परंतु मला वाटते जर त्यांनी राजकारण सोडले नसते तर ते आज एखाद्या राज्याचे निदान राज्यपाल तरी नक्कीच असते.

भाऊंनी अनेक सरकारी समित्यांवर काम केलेले आहे. त्यातील बहुतांश समित्या शेती व शेतकऱ्यांशी व ग्रामीण भागाशी संबंधित आहेत. उदा. शेती सल्लागार समिती सदस्य (१९८५ ते १९९१), शेतकऱ्यांच्यासाठी शेती अनुदान समिती सदस्य ( अखिल भारतीय कांग्रेस कमिटी), (१९८८ ते १९८९), चेअरमन नागरी व ग्रामीण विकास समिती, केंद्र सरकार नवी दिल्ली, (१९९३) अशा अनेक समित्यांचे ते सदस्य होते. हे झालं राज्य व देशपातळीवरील काम पण आपल्या वाईचा विचार केल्यास त्यांनी धोम धरण बांधताना घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर (आबा) यांच्या मार्गाने जाणारे भाऊ खऱ्या अर्थाने त्यांचे वारस शोभतात. भुईंजचा व खंडाळ्याचा साखर कारखाना उभारताना त्यांनी शेतकन्यांचे हित - डोळ्यासमोर ठेवले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी मातीला व मातेला - (आईला) कधीही विसरू नये असा - त्यांचा आग्रह असतो. 'शेतकरी नवरा - नको ग बाई' असे म्हणणाऱ्या मुलींना ते - शेतीचे महत्त्व पटवून देतात. सातान-याच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात बोलताना भाऊ म्हणाले होते, 'कोल्हापूरचा अर्धा एकरवाला शेतकरी ऐटीत राहतो पण मराठवाडा व विदर्भातील शंभर एकरवाला शेतकरी मात्र आत्महत्त्या करतो याचं कारण आपण शोधायला पाहिजे.' असा सवाल त्यांनी सभागृहाला विचारला व त्याचे उत्तरही त्यांचीच दिले, म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहूराजांप्रमाणे आपण द्रष्टे होऊया हे त्यांना त्यातून सांगायचे होते.

समाजाप्रती भाऊंच्या मनामध्ये अपार करूणा आहे. बहुजन समाजातील मुलांनी शिकून मोठं व्हावं ही त्यांची इच्छा असते. शिकलेल्या मुलांनी आपल्या घराला, गावाला व परिसराला विसरू नये, आपल्याबरोबरच कुटुंबाचा विकास साधावा हीच त्यांची अपेक्षा असते. ते ग्रामीण भागातील मुलांचा जास्त विचार करतात ही मी अनुभवलेली गोष्ट आहे. आमचे मूळ गाव अमृतवाडी (ता. वाई) हे नसले तरी गेली चाळीस वर्षे आम्ही या गावात रहात असल्याने याच गावचे झालो आहोत. मी २००१ पासून २००८ पर्यंत रयत शिक्षण संस्थेत सी. एच. बी. प्राध्यापक म्हणून

काम करीत होतो. एका प्रामाणिकपणे काम करून निवृत्त झालेल्या लिपिकाचा मी मुलगा असल्याने गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने माझ्या निवडीला अडचणी येत होत्या. त्यावेळी माझे पीएच.डी.चे कामही चालू होते. आम्ही गावातील लोक भाऊंना जाऊन भेटलो. त्यांना मी पात्र उमेदवार असल्याची जाणीव करून दिली. त्यांनी; माझ्या हातात काही नाही, तुम्ही मुलाखत चांगली द्या मग बघू; असे सांगितले. मुलाखत चांगली झाली व भाऊंनीही माझा आग्रह धरला त्यामुळे मला मला नोकरी मिळाली. रयतमध्येही निवड झाली असती पण त्याला किमान एक वर्ष लोटले असते.

अशाप्रकारे भाऊंनी एका सामान्य लिपिकाच्या मुलाला प्राध्यापक केले.

भाऊंनी त्यांचा परिवार एका धाग्यात बांधलेला आहे. 'सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या' अशी समाजाची परिस्थिती असताना एक 'आयडॉल' म्हणून भाऊंकडे पाहता येते. आपण त्यांच्याकडून आदर्श घेतला नाही तर मला येथे शिरवाडकरांच्या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांचा संवाद आठवतोय; 'ज्यांना नमस्कार करायला जागा नाही ती माणसं अभागी. आणि जागा असून ज्यांना नमस्कार करायचा धीर होत नाही ती निव्वळ

कपाळकरंटी' आपण अभागी की कपाळकरंटे ? आत्मपरीक्षण करूया ! भाऊंचे दातृत्व व कर्तृत्व तर सर्वश्रुतच आहे. दुष्काळनिधी संकलन असो वा कोणतीही मदत करायची असो ते स्वतःपासून सुरुवात करतात. असा ह्या हृदयामध्ये मानवतेबद्दल अपार करूणा असणारा मानवतेचा देव्हारा आहे असे मला वाटते. 'माणुसकी' - हा या देव्हा-यातील देव आहे. श्रीमद्भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायातील श्लोकात म्हटले आहे, 'सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो' (प्रत्येकाच्या हृदयात ईश्वरी अंश आहे)

असा ईश्वरी अंश भाऊंच्याठायी प्रकर्षाने दिसतो. या गोष्टीची अनेकांना प्रचिती आलेली आहे.

असा हा मानवतेचा उपासक असणारा माणूस आहे. त्यांचे जीवन कृष्णामाईप्रमाणे निर्मळ, नितळ व प्रवाही आहे. रयत परिवाराच्या 'रयत माउली'ने जसे सर्वांना प्रेम, ऊर्जा दिली त्यामुळे त्या सर्वांना प्रेरणास्थानी आहेत, तसे आमच्या किसन वीर परिवाराला प्रेमाची सावली देणारे 'भाऊ' आमचे ऊर्जास्थान आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा  देऊन त्यांच्यातील मानवतेला सलाम करुन थांबतो धन्यवाद....

Post a Comment

0 Comments