तणावमुक्त जीवनासाठी खळखळून हसणे सर्वोत्तम.
तणावमुक्त जीवनासाठी खळखळून हसणे सर्वोत्तम.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
औषध : श्री एन अशोक
सध्याच्या काळात ताणतणाव हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनत चाललेला आहे. बदलती जीवनशैली व नियमित व्यायामाचा अभाव यामुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देत आहोत व आजारपणातून बरे होण्यासाठी दवाखान्यात जातो, औषध गोळ्या घेतो. सुख समाधान दवाखान्यात गोळ्या औषधातून शोधतो आहोत. परंतु सुखी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी खळखळून हसणे हे सर्वोत्तम औषध आहे. खळखळून हसल्याने सकारात्मक विचार वाढतात. यामुळे आपण अनेक आजार टाळू शकतो. असे प्रतिपादन कोल्हापूर येथील ज्येष्ठ कलावंत, लेखक, गायक व सामाजिक कार्यकर्ते श्री. एन. अशोक यांनी 'चला हसण्याच्या गावी जाऊ' या एकपात्री अभिनयातून केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई स्टाफ अकॅडमी व स्टाफ वेल्फेअर समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'तणावमुक्त जीवनासाठी हास्य मैफिल' या मनोरंजनपर कार्यक्रमात श्री एन अशोक प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून समस्त श्रोत्यांना खळखळून हसवले व सामाजिक बांधिलकीचा संदेशही दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी प्रो. डॉ. विनोद वीर, श्री विवेक सुपेकर व डॉ. अंबादास सकट यांची विशेष उपस्थिती होती.
श्री एन अशोक यांनी आपल्या सादरीकरण व मार्गदर्शनातून सांगितले की, हसल्याने मानवी जीवनामध्ये सुख समाधान व चैतन्य निर्माण होते. यामुळे आत्मविश्वास वाढतो व आपले मानसिक तसेच शारीरिक आरोग्य निरोगी राहते. सुख व आनंद हे पैशाने खरेदी करता येत नाहीत. ज्या व्यक्तीबरोबर आई वडील राहतात तो व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो. आपण आई-वडील व कुटुंबाला आनंदी ठेवले पाहिजे. तसेच शक्य असेल तेवढे सामाजिक कार्य देखील केले पाहिजे. श्री एन अशोक पुढे म्हणाले की, त्यांनी आत्तापर्यंत एकूण 84 निराधार कुटुंबातील मुलांना दत्तक घेतले असून ते या मुलांचे पालन पोषण अशा प्रकारच्या 'चला हसण्याच्या गावी जाऊ' या कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातून करत आहेत.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात माणूस मोकळ्या मनाने हसणे विसरत चालला आहे. मानवी जीवनात अनेक चढ-उतार, अडी अडचणी, सुख दुःखाचे प्रसंग येत असतात. यामुळे मानव तणावग्रस्त जीवन जगत असतो. याचा परिणाम आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आपण निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी मनसोक्त हसले पाहिजे. यामुळे आपले कौटुंबिक वातावरण देखील आनंदी राहते. सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख व स्टाफ अकॅडमीचे समन्वयक प्रो. डॉ. विनोद वीर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार स्टाफ वेल्फेअर समिती समन्वयक डॉ. अंबादास सकट यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment