Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क जागृती कार्यक्रम..

 किसन वीर महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क जागृती कार्यक्रम..

--------------------------  

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी     

 कमलेश ढेकाणे 

--------------------------  

 वाई :-आधुनिक जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीमुळे येणाऱ्या नजीकच्या काळात 60% नोकऱ्या जातील असा अंदाज आहे त्यामुळे आजच्या तरुणांनी याचा गांभीर्याने विचार करून शैक्षणिक पाऊल टाकले पाहिजे. असे मत जगप्रसिद्ध आयपीआर तज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, आपल्या संस्कृतीमध्ये, मातीमध्ये, परंपरेमध्ये आपल्या पूर्वजांनी पेटंटचा विचार न करता केवळ समाजासाठी चांगल्या गोष्टींची निर्मिती केली आहे त्यांचे आपण जतन केले पाहिजे आणि त्या संदर्भात आपण नव्याने संशोधन करून त्याचे पेटंट घेतले पाहिजेत. त्यासाठी अथक परिश्रमाची गरज असून, आपल्यासारख्या महाविद्यालयीन तरुणांनी पुढे येऊन बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. जगाच्या तुलनेत चीन हा देश बौद्धिक संपदा हक्काच्या बाबतीत अग्रेसर आहे.या उलट आपला देश खूप खालच्या स्थानावर आहे. म्हणजे आपण बौद्धिक संपदा हक्काबाबत विशेष जागृत नाही असे दिसून येते. आपण आपल्या भारतीय वस्तूंच्या निर्मितीबाबत, शेतीतील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाच्या बाबत जागरूक राहून; जागतिक बाजारपेठेत त्या उत्पादनाला चांगली किंमत मिळवून देण्यासाठी या वस्तूंचा बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) प्राप्त करणे आवश्यक आहे. याबाबत आपण खूप मागे आहोत. म्हणून बौद्धिक संपदा हक्काबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. या संदर्भात आपण महाविद्यालयाच्या पातळीवर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन जास्तीत जास्त पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. असे मत ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथील संचालक, प्रा. गणेश हिंगमिरे यांनी मांडले.  

येथील किसन वीर महाविद्यालयमध्ये अंतर्गत दर्जा हमी कक्ष विभागाच्या वतीने आयोजित बौद्धिक संपदा हक्क जागृती कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही वस्तूला बौद्धिक संपदा अधिकार प्राप्त झाल्याशिवाय त्या वस्तूला योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे कायद्याने त्या वस्तूला किंमत मिळवायची असेल तर त्याचा बौद्धिक संपदा हक्क प्राप्त केला पाहिजे. आपल्याकडे अनेक अशा गोष्टी आहेत की, त्यास जागतिक बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. 

दुर्दैवाने आपल्याकडील काही पिकांची, वस्तूंची, निर्मिती भारतीय असूनही त्याचे हक्क बाहेरच्या देशातील लोकांनी घेतलेले आहेत. त्या वस्तूंवर आता भारतीयांचा हक्क राहिला नाही. इथून पुढे असे होता कामा नये. म्हणून बौद्धिक संपदा हक्क या संदर्भात सामाजिक जागृती निर्माण केली गेली पाहिजे आणि त्यासाठी आपल्यासारख्या तरुणांची गरज आहे असे ते म्हणाले.     

   या प्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, श्री. दीपक ननावरे व इतर कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे यांनी केले. डॉ. शिवाजी कांबळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments