सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न माणूस बनवणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे.
सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न माणूस बनवणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे.
---------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------
शिक्षणाद्वारे माणसाच्या मन, मनगट व मेंदूचा संतुलित विकास झाला पाहिजे. तरुणांमध्ये जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असेल तर ते यशाच्या कोणत्याही शिखरापर्यंत पोहोचू शकतात. स्वतः मधील क्षमता ओळखून त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कोणतेही कार्य करताना मन एकाग्र ठेवले पाहिजे. तरुणांनी नेहमी सकारात्मक विचार करावा. जर एखादी व्यक्ती स्वतःच दुर्बल समजत असेल तर ती दुर्बल बनते व जर एखादी व्यक्ती स्वतःला तेजस्वी समजत असेल तर ती व्यक्ती तेजस्वी बनते. असे प्रतिपादन पुणे येथील सिंबायोसिस महाविद्यालयातील माजी प्राध्यापक डॉ. शिरीष लिमये यांनी केले. ते येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी 'स्वामी विवेकानंदांचा तरुणांना संदेश' या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. व्यासपीठावर डॉ. अंबादास सकट (स्टाफ वेल्फेअर समिती- समन्वयक) प्रा. भिमराव पटकुरे (संख्याशास्त्र विभाग प्रमुख) व डॉ. अरुण सोनकांबळे (हिंदी विभाग) यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. शिरीष लिमये म्हणाले की, खरे शिक्षण म्हणजे एकाग्रता. ज्ञानप्राप्ती व स्वतःवर विजय मिळवायचा असेल तर एकाग्रता हवी. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास व कठोर परिश्रम घ्यावे लागतात. प्रत्येकाने आपल्यासमोर ध्येय ठेवले पाहिजे व त्याला आपले जीवन समजून ते ध्येय प्राप्त केले पाहिजे. प्रत्येकाने चारित्र्यसंपन्न जीवन जगले पाहिजे. चारित्र्य हे कर्माने घडते. तसेच आपले मन हे आपले व्यक्तिमत्व घडवत असते. माणूस जर चारित्र्यसंपन्न, कर्तुत्ववान व निस्वार्थी असेल तर त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे जागतिक दर्जाचे महान विचारवंत होते. त्यांनी भारतीय संस्कृतीची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. आजही ते तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. तरुणांनी स्वामी विवेकानंदांचे विचार अंगीकारले पाहिजेत. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजेच खरे शिक्षण आहे. प्रत्येकाचे आचार व विचार शुद्ध असावेत. विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात केले पाहिजे व चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. चांगले मित्र बनवले पाहिजेत तरच आपल्याला जीवनात पुढे जाता येते.
कार्यक्रमासाठी प्रो. डॉ. सुनील सावंत, प्रो. डॉ. भानुदास आगेडकर, डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. बाळासाहेब माघाडे, डॉ. संग्राम थोरात, डॉ. भीमाशंकर बिराजदार, श्री संतोष मुळीक, श्री संदीप पातुगडे, श्री सचिन गरगडे, श्री हर्षद मेढेकर, इंद्रजा मेढेकर, रेश्माबानो मुलानी, दिपाली चव्हाण आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंबादास सकट यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. भीमराव पटकुरे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुण सोनकांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment