Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न.

 किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न.

--------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे 
-------------------------------------

वाई:

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात देशभक्त किसन वीर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. या वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलनाने झाले. प्रसिद्धवक्तृत्व सिनेअभिनेता समृद्धीबाबा जाधव हे स्पर्धेचे उदघाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, तसेच संचालक श्री केशवराव पाडळे, सचिव डॉ. जयवंत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उदघाटक मा. समृद्धीबाबा जाधव त्यांच्या उदबोधक मार्गदर्शनपर भाषणात  म्हणाले की, "प्रत्येकाने आपल्या जीवनात वाचनाची आवड जोपासली पाहिजे. वक्ता हा ज्ञानाने संपन्न असा असला पाहिजे, कारण आत्मबल हे फक्त ज्ञानामुळेच मिळते. म्हणून प्रत्येकाने भरभरून वाचन केले पाहिजे. माणसाच्या जगण्याच्या प्रेरणाच माणसाचे जीवन समृद्ध करतात. प्राजक्ताची फुले जसे प्रत्येकाला आपला गंध देत असतात, अगदी तसेच वक्तेही आपल्या वाणीतून इतरांना आत्मबल देत असतात. आबांच्या नावाने सुरू असलेल्या या वक्तृत्व स्पर्धेत मला उदघाटनासाठी बोलावले त्यामुळे मला मनस्वी आनंद होत आहे. अशा वक्तृत्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला पाहिजे." या स्पर्धेमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासातील देशभक्त किसन वीर यांचे योगदान, लय अवघड हाय गड्या उमगाया बाप…,चक्रव्यूवात अडकलेला अभिमन्यूः आजचा मतदार, माणसाचे आयुष्य आता मोबाईल जगतोय, स्त्री शक्तीचा नारा केवळ शब्दातच फुलतो, अशी हवी तरुणाई राजकारणात! असे विषय दिलेले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. संजयकुमार सरगडे (छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा) प्रा. मिथुन माने (लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा) यांनी काम पाहिले. स्पर्धेमध्ये  महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण 14 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक श्री. तेजस पाटील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), द्वितीय पारितोषिक श्री विठ्ठल जगताप (छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा) तृतीय पारितोषिक कु श्रेया दाभाडे (किसन वीर महाविद्यालय, वाई) यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक कु. श्रेया यादव (शंकरराव जगताप आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वाघोली) व कु. रजनी पाटील (के.बी.पी. मॅनेजमेंट कॉलेज, सातारा) यांनी पटकावले. विजेत्या विद्यार्थ्यांना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री मदनदादा भोसले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना दादा म्हणाले की, "किसन वीर आबांच्या कार्यकर्तुत्वाचा जागर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाला पाहिजे हा उद्देश ठेवून गेली दहा वर्षे या स्पर्धेचे आयोजन आम्ही करीत आहोत.परंतु अलीकडे वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत चाललेला असून, हा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पुढच्या वर्षापासून बक्षिसांची रक्कम दुप्पट करून, पारितोषिकांची संख्या आपण नक्कीच वाढवूया आणि त्या संदर्भातील मान्यता मी आत्ताच देत आहे. कारण यासारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची अभ्यासू वृत्ती वाढते आणि यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते". सुरुवातीच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले,"भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात किसन वीर आबांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन करीत आहोत. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत". कार्यक्रमाच्या सुरुवातीला वक्तृत्व स्पर्धा संयोजक डॉ. बाळकृष्ण मागाडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून देशभक्त किसन वीर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यापाठीमागील उद्देश स्पष्ट केला. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्की होईल असे सांगितले. प्रा. (डॉ.) सुनील सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. उदघाटन कार्यक्रमाचे आभार डॉ. शिवाजी कांबळे यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे आभार डॉ. बाळकृष्ण मागाडे यांनी  मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंजुषा इंगवले व डॉ. अरुण सोनकांबळे  यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments