Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चाऱ्यासाठी आणि पोटासाठी कोसो दूर भटकंती. मेंढपाळांचे संघर्षमय जीवन.

 चाऱ्यासाठी आणि पोटासाठी कोसो दूर भटकंती. मेंढपाळांचे संघर्षमय जीवन.

 ------------------------------

रिसोड. प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

------------------------------

रिसोड ता.11: चाऱ्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी कोसो दूर भटकंती करत अनेक मेंढपाळ आणि त्यांचा लवाजमा रिसोड तालुक्यात दाखल झाला आहे. रणरणत्या उन्हात मुलाबाळासह दररोज किमान पंधरा ते वीस किलोमीटर वणवण भटकत फिरणाऱ्या एका मेंढपाळ कुटुंबाने आपल्या संघर्षमय जीवनाचा उलगडा दै. सकाळ सोबत संवाद साधतांना केला आहे. 

     आग ओकणाऱ्या रणरणत्या उन्हात शेकडो मेंढ्याचा कळप आणि त्यासोबत बैलबंड्या, कोंबड्या, रखवाली साठी पाळलेले कुत्रे व लहान मुलांबाळासह फिरणारे मेंढपाळांचे कुटुंब चाऱ्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी रानोमाळ फिरत आहेत. त्यांच्या या संघर्षमय जीवनात त्यांना अनेक अडीअडचणी व समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती एका मेंढपाळ कुटुंबाने खास सकाळ सोबत बोलतांना दिली आहे. त्या अनुषंगाने सदर कुटुंबाने दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणाबद्दल सांगताना, ते म्हणाले आमचे मुळगाव बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा असुन पोळ्याच्या सनापासून आम्ही मेंढ्या चारण्यासाठी बाहेर पडत असतो. तेंव्हा ज्यांच्या घरी वयोवृद्ध आजी - आजोबा, आईवडील वा ईतर कोणी नातेवाईक आहेत त्यांच्या आधाराने मुलं शाळेत जातात. मात्र ज्यांच्या घरी कोणीच नाही त्यांना नाविलाजाणे मुलांबाळासह घर सोडावे लागते. परिणामी अशा मुलांची व शाळेची आयुष्यात भेट सुद्धा होत नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. दुसरी बाब म्हणजे घर सोडून कोसो दूर रानोमाळ फिरत असताना वादळी वारा,विजा, गारपीट, उन्हाचा कडाका आदी नैसर्गिक संकटांसोबतच हिंस्त्र पशू पासून मेंढ्यांचे संरक्षण करावे लागते. त्यामुळे अनेक वेळा जीवघेणे प्रसंगांना सामोरे जावे लागते. आणि विशेष म्हणजे एव्हढा संघर्ष करूनही एक खंडीभर मेंढरा मागे सर्व खर्च वजा जाता केवळ ५० ते ६० हजार रुपये पदरी पडतात. त्यातच जर साथीच्या आजारांनी किंव्हा नैसर्गिक संकटामुळे मेंढरं मृत्युमुखी पडली तर सर्व मेहनत वाया जात असल्याची माहिती मेंढपाळांनी दिली आहे. 


*आखर बसविण्याऐवजी मोजावे लागतात चराईचे पैसे* 

पूर्वी घरगुती पशुपालन मोठ्यप्रमाणावर होत असायचे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांकडे किमान दोन बैल, गाय,म्हैस, बकऱ्या आदी जनावरे राहायची त्यामुळे आपसूकच चराईसाठी मुबलक प्रमाणात पडीक जमीन होती. तेंव्हा जमीन चांगली कसावी या उद्देशाने सधन शेतकरी आपल्या शेतात मेंढ्यांचे आखर बसवायचे त्यासाठी आम्हाला खाण्यापिण्यासाठी पिठकुठ,तेल, मिठमिरची आणि थोडीफार पैसे सुध्दा सबंधित शेतकऱ्यांकडून मिळायचे आता मात्र ती स्थिती नाही. पडीक जमीनीचे क्षेत्रच नगण्य राहिल्यामुळे वेळप्रसंगी आम्हालाच चराईचे पैसे संबंधित शेतकऱ्याला द्यावे लागत असल्याची खंत मेंढपाळांनी सकाळ सोबत बोलतांना व्यक्त केली आहे. 


प्रतिक्रिया. 

 " हा आमचा पिढीजात चालत आलेला व्यवसाय आहे. म्हणुन करावा लागतो. अन्यथा या व्यवसायात मिळकत कमी आणि जोखीमच जास्त आहे. आमच्या समाजातील जे शिकूनसवरून पुढे गेले आहेत त्यांनी हा व्यवसाय बंद केला आहे. आणि आमच्या समाजासाठी असलेल्या सरकारी सोई सुविधाचा लभ केवळ शिक्षणदार लोकच घेत आहेत. आम्ही अशिक्षित असल्याने आम्हाला माहिती पडत नाही. रानोमाळ भटकण्यापाई आम्ही मतदानापासून सुद्धा वंचित आहोत." 

       ___ संगीता शिवाजी मोरे. 

  ( फिरस्ते मेंढपाळ, मोताळा )

Post a Comment

0 Comments