Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राजकारण व शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ: आदरणीय प्रतापराव भोसले.

 राजकारण व शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ: आदरणीय प्रतापराव भोसले.




------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी 

 कमलेश ढेकाणे 

------------------------------

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरांयाच्या महाराष्ट्रातील सातारा राजधानीमध्ये कृष्णाकाठी वसलेले गाव म्हणजे भुईंज. याच भुईंज गावामध्ये श्री. प्रतापराव भोसले यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९३४ रोजी महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित असलेले श्री. बाबुराव भोसले म्हणजेच आण्णा व त्यांच्या पत्नी सौ.रत्‍नाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. वडिलांना समाजसेवेची आवड व गरीबांविषयी कणव होती. आई वडिलांच्या शिस्तबद्ध संस्कारात भाऊंच बालपण गेलं. एकुलता एक मुलगा म्हणून कोणतीही विशेष वागणूक भाऊंना मिळाली नाही. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीमध्ये आई वडीलांच्या साधी राहणी व उच्च विचारसरणी याचं प्रतिबिंब ठळकपणे दिसून येतं. पुढे भाऊंनी राजकारणामध्ये जवळपास सहा दशके आपले वर्चस्व संपादन करीत महत्त्वाची पदे भूषवीत केलेली दैदिप्यमान कामगिरी हा उत्तम संस्कारांचा भाग होय. 

आजच्या राजकारणाचा स्तर मूल्यांपासून घसरू पाहतो आहे. अशा वेळी एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या मुलाने आपल्या विलक्षण व अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर, जनतेच्या पाठिंब्यावर व यशवंत विचारांच्या बैठकीवर व देशभक्त आबासाहेब वीर यांच्या आशीर्वादाने राजकारणामध्ये उत्तुंग भरारी घेतली. तरीही आपला पत्ता मुक्काम पोस्ट भुईंज हा न बदलता आपल्या मातीशी व सर्वसामान्य लोकांशी नाळ कधीही तुटू दिली नाही. अशा चतुरस्त्र, सदविवेकी व निष्ठावान कार्यकर्त्याने काँग्रेसचा हाती घेतलेला झेंडा शेवटच्या क्षणापर्यंत सोडला नाही. राजकारणामध्ये सरपंच पदापासून सुरुवात करत सलग चार वेळा आमदार, दोन वेळा नामदार व तीन वेळा खासदार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष इतकी सन्मानाची पदे भूषवली. आजच्या राजकारण व राजनीतीचा विचार केला तर पुढच्या दहा पिढीला संपणार नाही इतकी माया त्यांना मिळवता आली असती पण विचारांची पक्की बांधिलकी व घट्ट संस्कारामुळे भाऊंनी कधीही आपला सन्मार्ग व नीतिमत्ता सोडली नाही. राजकारणात राहूनही केवळ समाजाचं हित साधले. माणसे जोडली, माणसे मिळवली म्हणूनच त्यांचे राजकारणातील स्थान ध्रुवताऱ्यासारखे आबाधित राहिले आहे.

नेहमी विश्वासाने भरलेले, अभ्यासू आणि फर्डे वक्ते, ओघवती भाषाशैली, उत्तम निरीक्षण शक्ती, साहित्य व कलाक्षेत्राची उत्तम जाण, पांढऱ्याशुभ्र वस्त्रातील रुबाबदार व देखणे व्यक्तिमत्व, स्पष्टवक्तेपणा, परखडपणाने मत मांडणारे व स्वच्छ चारित्र अशा असंख्य गुणांमुळे आदरणीय भाऊंनी आपला लौकिक आयुष्यभर टिकवून ठेवला. काँग्रेसच्या विचारांशी कायम प्रामाणिक राहिले. भाऊंचे राजकीय कर्तुत्व हे उत्तुंग नेतृत्वाची अनुभूती देते. समाजाच्या विकासासाठी अहोरात्र झटत राहणारा भाऊंसारखा नेता लाखात एखादाच असेल. त्यांची सहिष्णुता व निष्पृहतेला तोड नाही. तत्वांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही, पदासाठी लाचारी नाही. आयुष्यभर स्वाभिमान कधीही गहाण ठेवला नाही, जे योग्य ते योग्यच व अयोग्य ते अयोग्यच! म्हणूनच भाऊंना राजकारणातील भीष्माचार्य असेही म्हटले जाते. आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाच्या झंजावाताने महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला गेलेली सत्ता पुन्हा प्राप्त झाली. तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून त्यावेळीची भाऊंची भूमिका त्यागाचं उत्कृष्ठ उदाहरण आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान जागरण मंचद्वारे त्यांनी केलेले कार्य, धोम, कण्हेर व आंधळी धरणांची केलेली उभारणी व याच दरम्यान विस्थापित लोकांचे केलेले आदर्श पुनर्वसनाचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. किसन वीर सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी त्यांनी केलेली अहोरात्र धडपड व किसन वीर आबांची साथ यामुळे या भागातील लोकांचा झालेला विकास सर्वांनाच सुपरिचित आहे. महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणाला मिळालेले हे रत्न स्फटिकाप्रमाणे पारदर्शी व स्वच्छ राहिले. राजकारणातील मिळालेल्या सर्व पदांचा उपयोग केवळ समाजकारणासाठी व जनतेच्या विकासासाठी केला. या सर्व राजकीय प्रवासामध्ये त्यांनी कधीही भ्रष्टाचाराचा डाग स्वतःला लागू दिला नाही. भुईंजमध्ये साध्या घरात राहून लोकप्रपंचाचा गाडा हाकला. एक जबरदस्त नैतिक अधिष्ठान भाऊंच्या ठिकाणी होते. त्यामुळे त्यांचे समाजकारणातील व राजकारणातील कार्य दीपस्तंभाप्रमाणे नेहमीच इतरांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक राहील.

जनता शिक्षण संस्थेचे विश्वस्त व अध्यक्ष म्हणून आदरणीय भाऊ यांनी १९८० ते २०२१ पर्यंत आपल्या अनोख्या कार्यपद्धतीचा ठसा उमटविला. केवळ ८० विद्यार्थ्यावर सुरू झालेले हे महाविद्यालय आता वटवृक्षांमध्ये रूपांतरित झाले आहे. महाविद्यालयाकरिता अनेक इमारतींची उभारणी, आधुनिक व सुसज्य प्रयोगशाळा, बी.सी.ए. कोर्ससाठी स्वतंत्र इमारत व व्यवस्था, क्रीडांगण व इनडोअर स्पोर्ट हॉलची निर्मिती, मुलींचे वसतिगृह, महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोफत वसतिगृहाची उभारणी इ. अनेक उपक्रम आदरणीय भाऊ यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या विकास करण्यासाठी उभे केले. या विकासाचा सर्व स्रोत आदरणीय भाऊ राहिले. विशेष बाब म्हणजे संस्थेच्या प्राध्यापक व कर्मचारी निवडीकरिता आदरणीय भाऊंनी एक रुपया सुद्धा डोनेशन किंवा लाच घेतली नाही. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, अनुभव व मुलाखतीमधील परफॉर्मन्स या जोरावर नेमणुका केल्या. आदरणीय भाऊनी हे तत्व व सत्व आयुष्यभर जोपासले. आणखी विशेष म्हणजे याच तत्वाचा अंगीकार करीत विद्यमान अध्यक्ष मा. मदनदादा भोसले सुद्धा संस्थेचा कारभार अत्यंत यशस्वीपणे चालवत आहेत.

     आदरणीय भाऊंनी मनात आणले असते तर करोडो रुपये मिळवले असते पण वाई परिसरातील शेकडो मुले कमीत कमी फीमध्ये शिकावीत व त्याकरता नेमण्यात येणारे शिक्षक हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे व उत्तम क्षमतेचे मिळावेत याकरिता भाऊंनी पाळलेली तत्वे व निष्ठा समाजातील सर्वांसाठी दिशादर्शक व पथदर्शी राहतील.  

     आदरणीय भाऊंचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सहकार, शेती, खेळ व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील कार्य उत्तुंग, उच्च प्रतीचे व सर्वसामान्यांच्या हिताचे राहिले आहे. त्यामुळे त्यांची वैचारिक श्रीमंती सर्व राजकीय पुढार्‍यांना लाभावी व आधुनिक भारताच्या उभारणीमध्ये भाऊंच्या जीवनमूल्यांची पुन्हा एकदा पायाभरणी व्हावी, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. आदरणीय भाऊंच्या सर्व कार्याला मनापासून सलाम व भावपूर्ण श्रद्धांजली.


ग्रंथपाल, डॉ. शिवाजीराव कांबळे

किसन वीर महाविद्यालय, वाई

Post a Comment

0 Comments