Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ लोकराजा राजर्षी शाहू महाराज" – डॉ विलास खंडाईत

 "सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ लोकराजा राजर्षी शाहू महाराज" – डॉ विलास खंडाईत

----------------------------------

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

----------------------------------

वाई : दि.२६/६/२०२४ " छत्रपती शाहू महाराजांचा कालखंड २६ जून १८७४ ते ०६ मे १९२२. केवळ ४८ वर्षे आयुष्य लाभलेले ते एक लोक राजे होते. कमी आयुष्य लाभलेले असूनही छ. शाहू महाराजांनी जो सामाजिक न्यायाचा लढा दिला तो दीपस्तंभ सारखाच होता. छ. शाहू महाराजांच्या राज्यारोहणानंतर अवघ्या बारा दिवसांनी सरकारी कामानिमित्त आलेल्या सरकारी अधिकारी यांच्या शिष्टाईसाठी होणारा खर्च गोरगरीब जनतेकडून न घेता कोल्हापूरहून आमच्या खाजगी खात्यातून खर्च करण्यात यावा. असा आदेश काढला. ०३ ऑगस्ट १९१८ रोजी महाराजांनी हुकूम काढून महार, मांग, रामोशी व बेरड या जातींच्या लोकांची हजेरी पद्धत कायमची बंद केली. महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी चार जाहीरनामे काढले. संस्थानातील कुलकर्णी वतन खालसा करून; ब्रिटिश राजवटीप्रमाणे तलाठी नेमण्याची पद्धत स्वीकारली व त्या पदावर काम करण्यासाठी अस्पृश्यांना संधी दिली." असे प्रतिपादन किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील डॉ. विलास खंडाईत यांनी केले. येथील किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थी विकास समिती,राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर जयंती निमित्ताने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते.

                  डॉ. विलास खंडाईत पुढे म्हणाले की, "दिन, दलित, पीडित, वंचित समाजाला न्याय देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम आरक्षणाची तरतूद करणारा राजा म्हणून छ. राजर्षी शाहू महाराज यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. आंतरजातीय विवाहाची प्रथा आपल्याच घराण्यापासून सुरू करून; सामाजिक न्यायाची लढाई महाराजांनी लढून, आपल्यासमोर आदर्शचा दीपस्तंभ उभा केला. तसेच हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्यासाठी महाराजांनी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येते. आज समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण होत असताना छ. राजर्षी शाहूंच्या विचारांच्या अंमलबजावणीची गरज महाराष्ट्राबरोबरच आपल्या देशालाही आहे. हे आपणास विसरून चालणार नाही ".आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले की, छ. राजर्षी शाहू महाराजांचे काम प्रचंड आहे.एका व्याख्यानात छ. राजर्षी शाहू महाराज यांना आपण मांडू शकत नाही. महाराजांनी कोल्हापूर संस्थानांमधील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी राधानगरी धरण स्वखर्चातून बांधले. यामुळे गेले १०० वर्षापासून कोल्हापूर जिल्हा शेतीच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम झाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. छ.राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले काम दीपस्तंभासारखेच आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या वस्तीगृहाची निर्मिती केली".

                   कार्यक्रमाच्या सुरुवातीला छ. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून; वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. समीर पवार यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार डॉ. संग्राम थोरात यांनी मानले. या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments