सांगली फाटा येथे विचित्र अपघातात आलिशान गाड्यांचे लाखांचे नुकसान.
सांगली फाटा येथे विचित्र अपघातात आलिशान गाड्यांचे लाखांचे नुकसान.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-----------------------------------------
आज बुधवार दि.26 रोजी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथील सांगली फाटा उड्डाण पुलावर दुपारी 1 च्या सुमारास हा अपघात घडला. सविस्तर माहिती अशी की सांगली फाटा येथील उड्डाणपुलावर दोन्ही बाजुंनी वाहतूक सुरू असलेने रस्ता आखूड झाला आहे.त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर गाड्यांचा वेग कमी होतो.दुपारी 1 च्या सुमारास एम एच ०६ ए क्यू ०२३२ या क्रमांकाचा डंपर कोल्हापूर च्या दिशेने चालला होता आणि त्याच्या पाठोपाठ एम एच १२ डब्लू क्यू ९८९८ या क्रमांकाची फॉर्च्यूनर व एम एच सी एम ७५८५ या क्रमांकाची टाटा मांझा ही कारगाडी कमी वेगात चालली होती. तेवढ्यात या तिन्ही गाड्यांच्या मागे पाठोपाठ एम एच ०९ जी जे ६२६६ या क्रमांकाचा दुसरा एक डंपर आला,चालकास अंदाज न आल्याने त्याने टाटा मांझा गाडीला जोराची धडक दिली, त्यामुळे टाटा मांझा गाडी ही फॉर्च्युनर गाडीला जाऊन धडकली तसेच फॉर्च्यूनर गाडी ही पुढील बाजूस असणाऱ्या डंपर वर जाऊन आदळली. या अपघातामध्ये त्या दोन आलिशान कार गाड्यांचा चक्काचुर झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास एक तास वाहतूक कोंडी झाली होती .पोलिसांनी व महामार्ग कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन क्रेन बोलवून गाड्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला जवळपास 5 किलोमीटर पर्यंत लागल्या होत्या.घटनास्थळी पोहोचताना वाहतुकीची कोंडी झाल्याने पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
Comments
Post a Comment