स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे C2 वर आधारित हमीभाव द्यावा भूमिपुत्र तालुकाध्यक्ष अमोल बाजड
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे C2 वर आधारित हमीभाव द्यावा भूमिपुत्र तालुकाध्यक्ष अमोल बाजड.
--------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीतसिहं ठाकूर.
--------------------------------------
➖➖➖➖➖➖➖
उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर केल्याचा दावा बुधवारी सरकारने केला. पण सरकारने पुन्हा एकदा हातचलाखी करत C2 ऐवजी A2 + FL वर आधारित उत्पादन खर्च काढला आहे. सरकारने C2 उत्पादन खर्च गृहीत धरून त्यावर ५० टक्के नफा दिला असता तर सोयाबीनला ६ हजार ४३१ रुपये आणि कापसाला ९ हजार ३४५ रुपये हमीभाव मिळाला असता. त्यामुळे सरकारने तांत्रिक खेळ थांबवून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे C2 वर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी भूमिपुत्र तालुकाध्यक्ष अमोल विश्वनाथ बाजड व शेतकरी करत आहेत.लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला शेतकऱ्यांच्या रोषाचा मोठा सामना करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असा कयास लावला जात होता. हमीभावातही चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा होती. त्यातच केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषिमूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीत सोयाबीन आणि कापसाच्या भावाचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे सांगितले होते. सोयाबीनला ५ हजार १०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणीही केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.सरकारने हमीभावात चांगली वाढ करण्याच्या अपेक्षेवर पाणी तर फेरलेच, शिवाय हमीभाव जाहीर करताना आपली जुनीच हातचलाखी कायम ठेवली. सरकारने हमीभाव जाहीर करताना खरिपातील सर्वच पिकांचा हमीभाव उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा गृहीत धरून जाहीर केल्याचे सांगितले. पण सरकारने पिकांचा उत्पादन खर्च सर्वसमावेशक धरला नाही. म्हणजेच C2 उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव न देता A2 + FL खर्चावर ५० टक्के नफा दिला आहे. शेतकरी मागच्या अनेक वर्षांपासून C2 उत्पादन खर्चावर हमीभाव जाहीर करण्याचे मागणी करत आहेत. पण यंदाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.
*काय आहे C2 आणि A2 + FL खर्च ?*
स्वामिनाथन आयोगाने उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केलेली होती. पण हा उत्पादनखर्च सर्वसमावेशक असावा, अशी आयोगाची अपेक्षा होती. पिकांचा उत्पादनखर्च तीन प्रकारे मोजला जातो. A2, (A2 + FL) आणि C2.
A2 ः एखादे पीक घेताना बियाणे, खते, रासायनिक कीटकनाशके, मजूर, सिंचन, इंधन इत्यादींसाठी जो खर्च येतो हा खर्च A2 मध्ये मोजला जातो.
A2 + FLः खर्चाची ही व्याख्या थोडी व्यापक असून यात A2 खर्चासह शेतकरी आणि त्याच्या कुटुंबीयांनी शेतात केलेल्या कामाची मजुरी गृहीत धरली जाते.
C2ः खर्चाची ही व्याख्या सर्वसमावेशक आहे. C2 मध्ये A2 + FL खर्चासोबतच ज्या जमिनीवर पीक घेतले जाते, त्या जमिनीचे आभासी भाडे, खंड आणि स्थायी भांडवली साधनसामुग्रीवरील व्याज हे सुद्धा मोजले जाते.
*C2 नुसार सोयाबीनचा हमीभाव ६४३१ रुपये*
सरकारने A2 + FL वर आधारित उत्पादन खर्च गृहीत धरला आहे. या सूत्रानुसार सोयाबीनचा उत्पादन खर्च ३ हजार २६१ रुपये येतो. सराकरने त्यावर ५० टक्के नफा गृहीत धरून ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाही केला. पण जर सरकारने C2 सूत्रानुसार उत्पादन खर्च गृहीत धरला असता तर उत्पादन खर्च आला असता ४ हजार २९१ रुपये. त्यावर ५० टक्के नफा दिला असता तर हमीभाव आला असता ६ हजार ४३१ रुपये. म्हणजेच सरकारने यंदा जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा १ हजार ५३९ रुपये जास्त हमीभाव मिळाला असता.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावावर पुनर्विचार करावा अशी मागणी भूमिपुत्र तालुकाध्यक्ष अमोल बाजड यांनी केली आहे .
Comments
Post a Comment