नवी मुंबईमध्ये आणखी एका तरुणीची हत्या,गळा आवळून संपवले.
नवी मुंबईमध्ये आणखी एका तरुणीची हत्या,गळा आवळून संपवले.
-----------------------------------
मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
-----------------------------------
नवी मुंबई :-उरण येथे यशश्री शिंदे हिची निघृण हत्या तिचा प्रियकर दाऊद शेख याने केल्याच्या घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच नवी मुंबईत आणखी एका तरुणीची प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
सीवूड येथे राहणारी भाविका मोरे (वय – 19) हिची तिचा प्रियकर स्वस्तिक पाटील याने डीपीएस तलावाजवळ गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः खाडीत उडी मारली. घटनास्थळावरून पोलिसांनी पाटील याची बाईक हस्तगत केली आहे. मात्र त्याचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.
भाविका मोरे ही नवी मुंबईतील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तर पनवेल येथे राहणारा स्वस्तिक पाटील हा मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. हे दोघेही दुचाकीवरून काल डीपीएस तलावाजवळ आले. काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेल्यानंतर स्वस्तिकने भाविकाचा गळा आवळला. यातच तिचा मृत्यू झाला. ती जमिनीवर कोसळल्यानंतर स्वस्तिकने डीपीएस तलावाजवळ असलेल्या खाडीत उडी मारली. पोलिसांनी घटनास्थळावरून स्वस्तिकची बाईक हस्तगत केली आहे.
मुलीचा मृतदेह प्रथम स्थानिक मच्छीमाराला आढळून आला. यानंतर मच्छीमाराने त्वरित पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले असता ती तरुणी एका तरुणासोबत दुचाकीवरून आल्याचे दिसले. भाविकाला या ठिकाणी घेऊन येणारा स्वस्तिक पुन्हा परत जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसला नाही. दरम्यान पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आज या भागात स्वस्तिकचा शोध घेतला.
Comments
Post a Comment