मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा कार्यशाळा संपन्न.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा कार्यशाळा संपन्न.
-----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
कु.श्रृती सचिन कुंभार
-----------------------------
कोल्हापूर ता. 07 : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, विषयतज्ज्ञ यांची कार्यशाळा शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघ हॉलमध्ये संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे प्रमुख उपस्थित होते.
'मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा' हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. शाळांमधून पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, इमारत, स्वच्छतागृहे, परसबाग, ग्रंथालय, वीजेची सुविधा, वृक्षारोपण, शिक्षकांची उपलब्धता, शालेय प्रशासन, पोषण आहार, यु-डायस सरल प्रणाली व अनेकविध विषयांची उपलब्धता व त्याची गुणवत्ता याबाबत प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. शहरात दि.5 ऑगस्ट 2024 पासून या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. शाळांमधून या सर्व बाबींची उपलब्धता असणे आवश्यक असून या प्रत्येक बाबीसाठी गुणांकन दिले जाणार आहे. सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी शहरस्तरीय, जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचे गठण करण्यात आली आहे.
मूल्यांकनामधील गुणांकनानुसार शाळेचे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढले जाणार असून प्रथम आलेल्या शाळा या जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर पर्यंत जाऊ शकतात. यासाठी शासनाने भराव बक्षिस योजनाही जाहीर केली असून बक्षिसाची रक्कमही मोठी आहे. शाळांमधून आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन शाळेची गुणवत्ता वाढावी या दृष्टीकोनातून 'मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा' हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील यांनी केले तर शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई यांनी आभार मानले.
यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी, MIS को ऑर्डी.नचिकेत सरनाईक, शा.शि. निरीक्षक सचिन पांडव, विषयतज्ज्ञ अस्मा गोलंदाज, अर्चना काटकर, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर.वाय.पाटील शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक याबरोबरच शांताराम सुतार व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment