भंगार व्यवसायाकडून पेटवला जातोय खुलेआम कचरा.
---------------------------------
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
---------------------------------
प्रदूषण महामंडळा कडून गांधारीची भूमिका ? कारवाई होणार का ? नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मेढा :१०/०८/२०२४
जावली तालुक्यात विनापरवाना सुरू असणाऱ्या परप्रांतीयांच्या भंगार दुकानापुढे भंगार मालक व कामगारांकडून भंगार साहित्यामधून राहिलेला कचरा व केबली पेटवून दिल्या जात आहेत.तालुक्यातील कुडाळ,करहर,केळघर मेढा,या भागातील काही भंगार व्यवसायकांकडून आपल्या दुकानासमोर राजरोसपणे कचरा पेटवण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.जावली तालुक्यामध्ये एकूण 25 भंगार व्यवसाय असून यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे उद्योग व्यवसाय प्रमाणपत्र आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
यातच या कचऱ्यामध्ये कोण कोणते साहित्य पेटवले जात असेल हा प्रश्न अनुत्तरित असून याची प्रशासनाने माहिती घेणें आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी कुडाळ परिसरात असणाऱ्या भंगार दुकानांमध्ये विना कागदपत्राची वाहने स्क्रॅप करण्यासाठी घेतली जात असल्याचे देखील नागरिकांच्या चर्चेमधून समोर येत आहे.त्यामुळे तालुक्यातील या भंगार व्यवसायिकांकडून नेमक्या कोणकोणत्या वस्तू घेतल्या जातात याचीही सखोल चौकशी प्रशासनामार्फत व्हायला हवी.तसेच विनापरवाना या परप्रांतीय व्यवसायिकांना नेमके कोणाचे अभय आहे.याबाबत सखोल चौकशीची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.भंगार व्यवसायिक कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांना न जुमानता मोठ्या प्रमाणात भंगारातील कचरा एकत्र करून भंगार दुकानांपुढेच पेटवत आहेत.यामुळे परिसरात मोठ-मोठे धुराचे लोट पसरत असून आजूबाजूच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.
भंगार व्यवसायिकांच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतजमिनीमध्ये जाताना शेतकऱ्यांनाही अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच काही भंगार दुकानांमध्ये विविध प्रकारचे केमिकल किंवा ऑइल ड्रम अश्या वस्तू घेतल्या जात असल्यामुळे त्यातील राहिलेले ऑइल देखील मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये पसरत असल्याने त्याचा त्रास परिसरातील शेतीला व नागरिकांच्या आरोग्याला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत प्रदूषण महामंडळकडून या भंगार व्यवसायिकांवर त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक,शेतकरी व परिसरातील वाहतूकदार करू लागले आहेत.
चौकाट:
भंगार व्यावसायिकांचा मनमानी कारभार चालू आहे,त्यांनी शासनाची रितसर परवानगी घेऊन आपले व्यवसाय केले पाहिजे असे न करता सदर व्यवसायिक मनमानी कारभाराने आपली दुकाने थाटत आहेत.तसेच दिलेल्या एरिया पेक्षा जादा अतिक्रमण करून समाजाला त्रास होईल असे कृत्य संबंधिताकडून होत आहे.तसेच सदर ठिकाणी विविध प्रकारचे प्लास्टिक व इतर साहित्य जाळून प्रदूषण निर्माण करीत आहेत.रस्त्यावर,रस्त्याच्या कडेला भंगारातील साहित्य टाकून समाजाला त्रास होईल अशी कृती संबंधितांकडून होत आहेत.ही बाब निश्चितच चुकीची आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने भंगार व्यवसायिकाला परवानगी देताना किंवा विना परवाना असणाऱ्यांच्या वर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना शिस्त लावण्यात यावी.
महारुद्र तिकुंडे,
माहिती अधिकार
0 Comments