Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपाला खिंडार? भाजपाच्या माजी करवीर तालुका प्रमुख वसंत पाटलांची विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा .

 कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपाला खिंडार? भाजपाच्या  माजी करवीर तालुका  प्रमुख वसंत पाटलांची विधानसभेची  निवडणूक लढवण्याची घोषणा .

------------------------------ 

 कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

 भारतीय जनता पार्टीचे माजी करवीर तालुका प्रमुख वसंत पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा शनिवारी कंदलगाव येथे मेळावा घेतला. यामध्ये भाजपाकडून उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली तरीही विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.


 कोल्हापूर दक्षिण मतदार संघात कंदलगाव येथील वसंत पाटील हे खासदार धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक मानले जातात. भारतीय जनता पार्टीचा करवीर तालुकाप्रमुख पदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. गत निवडणुकीत वसंत पाटील यांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती.


 शनिवारी कंदलगाव येथे वसंत पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यामध्ये भाजपाकडे विधानसभेसाठी  तिकिटाची  मागणी करावी, तिकीट मिळाले अथवा न मिळाले तरीही निवडणूक लढवण्याचे ठरवण्यात आल्याचे समजते.

 वसंत पाटील यांच्या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

 कोल्हापूर दक्षिण मतदार संघात  आमदार ऋतुराज  पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांच्यात चुरशीची लढत होते.वसंत पाटील यांच्या  निवडणूक लढवण्याच्या  निर्णयामुळे कोल्हापूर दक्षिण मतदार संघात विद्यमान आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार अमल महाडिक  व भाजपाचे माजी करवीर तालुकाप्रमुख वसंत पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.


 मिळालेल्या माहितीनुसार वसंत पाटील यांना दोन पक्षांकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी ऑफर आल्याचे समजते.

 याबाबत वसंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपण विधानसभेची निवडणूक  पक्षाकडून तिकीट मिळाल्यास पक्षाच्या चिन्हावर लढवणार आणि उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष लढणार असल्याचे सांगितले.


 चौकट

 कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपा मधून आउटगोइंग सुरूच 


 अत्यंत संवेदनशील असणाऱ्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघात आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचा काँग्रेसचा प्रबळ गट आहे .भाजपाचे  खा. धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांचा गट  आहे. भाजपामधून गेल्या काही महिन्यांपासून आउटगोइंग सुरूच आहे. मोरेवाडी येथील आशिष पाटील व त्यांचे सहकारी, पाचगाव येथील  ग्रामपंचायत सदस्य अतुल गवळी, भाजपाचे माजी युवा मोर्चा अध्यक्ष विशाल पाटील, अमर जीतकर व त्यांचे सहकारी, गांधीनगर येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपला राम राम करत  आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वसंत पाटील यांच्या निर्णयामुळे भाजपमधील गळती सुरूच असल्याचे समोर आले आहे. पाचगाव मधीलही भाजपाचे काही प्रमुख कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.


 चौकट दोन 


 वसंत पाटील यांच्या मेळाव्याला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती 


 वसंत पाटील यांनी कंदलगाव येथे शनिवारी निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.यामध्ये परिसरातील विविध गावांमधील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.


 चौकट तीन 

 वसंत पाटलांना दोन पक्षांकडून ऑफर?


 वसंत पाटील यांना निवडणूक लढवण्यास संदर्भात दोन पक्षांकडून ऑफर आल्याचे समजते. याबाबत ते दोन दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार  आहेत.

Post a Comment

0 Comments