शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत गतीने कामे करा – राजेश क्षीरसागर.
शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत गतीने कामे करा – राजेश क्षीरसागर.
कोटीतीर्थ यादववनगर वसाहतीमधील झोपडपट्टीधारकांना १५ दिवसांत प्रॉपर्टी कार्डचे वितरण.
संकपाळ नगर, माळी कॉलनी येथील रस्ते आणि मोकळ्या जागेबाबत शिथीलता देण्यासाठी संचालक, नगर रचना यांना दूरध्वनीद्वारे सूचना.
*कोल्हापूर, दि. ०५* : कोल्हापूर शहरातील ६४ झोपडपट्टयांपैकी ११ ठिकाणी प्राधान्याने प्रॉपर्टी कार्ड वितरणाचे काम सुरू आहे. याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत राजेश क्षीरसागर यांनी शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत गतीने कामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनासह महापालिकेला दिल्या. यावेळी कोटीतीर्थ यादवनगर वसाहतीमधील झोपडपट्टीधारकांना १५ दिवसांत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्याचे निर्देश दिले. तसेच संकपाळ नगर, माळी कॉलनी येथील रस्ते आणि मोकळ्या जागेबाबत शिथीलता देणे आवश्यक असून याबाबत संचालक नगर रचना पुणे यांना दूरध्वनीद्वारे त्यांनी आवश्यक सूचना केल्या. या बैठकीला महानगरपालिका अति.आयुक्त राहूल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, महापालिकेचे हर्षजीत घाटगे, जिल्हा सह आयुक्त नगर विकास नागेंद्र मुतकेकर, महापालिका प्रधानमंत्री आवस योजनेचे युवराज जबडे उपस्थित होते.
बोंद्रे नगर झोपडपट्टी येथील सन २००० पूर्वीचा रहिवास असणारी घरे ६० असून २०११ पूर्वीचा रहिवास असणारी घरे ७७ आहेत. ७७ झोपडीधारकांच्या नावे जागा होऊन त्यांचे नाव सात बारा उताऱ्यावर लावण्यात आलेले आहे. सद्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम सुरू असून दुसऱ्या स्लॅब पर्यन्त काम पूर्ण झाले आहे. बांधकाम अंतिम टप्यात आले असून लवकरच ७७ लाभार्थीयांना घरचा ताबा मिळणार आहे. कोटीतीर्थ यादव नगर येथे एकूण अतिक्रमीत घरे, झोपड्यांची संख्या ९२० असून एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत तिथे घरे विकसित केली आहेत. उर्वरित घरांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने प्रलंबित आहे. तसेच यादव नगर भागात श्रेणीवाढ योजनेअंतर्गत चार गृहनिर्माण संस्था निर्माण केल्या असून सभासदांना जागावाटप करून बांधकाम झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शासन निर्णय २०१८ नुसार एकूण ९१ लाभार्थी नियमनुकूल करण्यास प्रस्तावित करण्यात आलेले असून त्यांची नावे प्रॉपर्टी कार्डला दाखल करण्यासाठी आदेश झालेली आहे. दस्त करण्याची कार्यवाही सुरू आहे.
संकपाळ नगर (क बावडा) झोपडपट्टी येथे एकूण अतिक्रमीत घरे, झोपड्या २३० संख्या असून सन २००० पूर्वीचा रहिवास असणारे घरे २१० व नंतर २०११ पूर्वीचा रहिवास असणारी घरे २० आहेत. २०१८ नुसार प्रधानमंत्री आवास योजनेनुसार अतिक्रमण नियमाणुकूल करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. सदर प्रस्तावामध्ये अंतर्गत रस्ते आणि मोकळी जागा यामध्ये शिथिलता आवश्यक आहे. याकरिता सहाय्यक संचालक, नगर रचना को. म. न. पा. यांचे कडून जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीने प्रकरण संचालक, नगररचना पुणे महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर केले आहे. याबाबत त्यांनी लवकर प्रश्न निकाली काढण्यासाठी क्षीरसागर यांनी दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या.
याचबरोबर दत्त मंदिर (कागलकर जमिनीजवळ) क बावडा झोपडपट्टी, वारे वसाहत (संभाजी नगर) झोपडपट्टी, देसाई बंगला जवळ, माळी कॉलनीम टाकाळा, झोपडपट्टी, कामगार चाळ पिछाडिस, झोपडपट्टी, शेंडा पार्क (लेपरसी कॉलनी) स्वाधार नगर, झोपडपट्टी येथील कामांबाबतही या बैठकीत आढावा झाला. यावेळी क्षीरसागर यांनी याबात स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांना तयार करा, शासनाच्या मदतीचे महत्त्व पटवून देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या.
राजाराम बंधाऱ्यावरील पुलासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेबाबत यावेळी चर्चा झाली. मोजणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पुढील पावसाळ्याआधी पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी नियोजन केले जाईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. रंकाळा येथील अमृत योजनेचे उर्वरित काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी महानगरपालिका प्रशासनाला दिले.
Comments
Post a Comment