शेतकऱ्यांच्या हितासाठी बालाजी साखर कारखाना सुरू होणे गरजेचे आ. भावनाताई गवळी यांचा सकारात्मक प्रतिसाद.p
शेतकऱ्यांच्या हितासाठी बालाजी साखर कारखाना सुरू होणे गरजेचे आ. भावनाताई गवळी यांचा सकारात्मक प्रतिसाद.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
वाशिम : जिल्ह्यातील मसलापेन येथील बालाजी सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडून आहे. रिसोड तालुक्यातील मसलापेन येथील एका उजाड माळरानावर नंदनवन फुलविणारा सदर साखर कारखाना आजमितीस ओसाड पडला आहे. त्या अनुषंगाने बालाजी साखर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. भावनाताई गवळी यांची ७ सप्टेंबर रोजी भेट घेऊन कारखाना पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली आहे. दरम्यान शेतकरी व साखर कामगारांच्या हितासाठी बालाजी साखर कारखाना सुरू होणे गरजेचे असल्याचे मत आ. गवळी यांनी व्यक्त करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू अशी सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती बालाजी साखर कामगार संघटनेच्या सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील एकमेव असलेला बालाजी सहकारी साखर कारखाना केवळ शेतकऱ्यांसाठीचे नव्हे, तर अनेक कामगारांना, लहान-मोठ्या व्यावसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ठरला होता. परिणामी एकेकाळी उजाड माळरान असलेल्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून नंदनवन फुलले होते.पण विदर्भातील सहकार क्षेत्राला लाभलेल्या शापातून बालाजी साखर कारखाना सुद्धा सुटला नाही. तत्कालीन संचालक मंडळातील अंतर्गत धुसपुस आणि व्यवस्थापन व कामगार संघटनेचे उडालेले खटके निमित्तास कारण ठरले आणि पाहता पाहता फुललेले नंदनवन ओसाड पडले ते आजतागायत कायम आहे. व्यवस्थापनातील एकछत्री अंमल कारखाना बंद पडण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात असले तरी जिल्ह्यातील आजी, माजी आमदार खासदार व सहकार क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी सुद्धा बालाजी कारखाना सुरू रहावा किंव्हा पूर्ववत सुरू करावा यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. हे कटू सत्य सुद्धा आज उजागर होत आहे. मध्यंतरीच्या काळात सदर कारखाना विक्री करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता,परंतु काही भागधारकांनी न्यायालयात धाव घेऊन विक्रीपासून बचावला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणामी राज्य सहकारी बँकेने बालाजी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचे निश्चित करून त्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया सुद्धा प्रसिद्ध केली आहे. राज्यातील एका अग्रगण्य दैनिकात १२ आगष्ट २०२४ रोजी तिसऱ्यांदा कारखाना भाड्याने देण्यासाठी राज्य सहकारी बँकेने निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासंदर्भात कामगार संघटनेचे पदाधिकारी जे.आर.मोरे, आर.बी.खडसे, वसंतराव टाले, भीमराव खोडके, व्ही.आर.बोंडे, गणपतराव बोरकर आदींनी विदर्भकन्या आ. भावनाताई गवळी यांची भेट घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी सविस्तर चर्चा केली असता आ.गवळी यांनी पुढील काम सर्वांमिळून पार पाडू अशी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आ. भावनाताई गवळी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले असल्याची माहिती आर.बी. खडसे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment