तरुणांनी वाईट व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.
तरुणांनी वाईट व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.
---------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------------
वाई- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ. मेघा जेरे व्यासपीठावर डॉ. रूपाली कदम , प्र. प्राचार्य डॉ. झांबरे आदी मान्यवर तरुणांनी चांगल्या नीतीमूल्यांचे पालन केल्यास, ते भारतासाठी सक्षम नागरिक बनतील. त्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ता सौ. मेघा जेरे यांनी केले. येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास समिती, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, एनसीसी युनिट आणि भारत विकास परिषद, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यसनाधीनता - व्यसनमुक्ती’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे होते. याप्रसंगी कला वाणिज्य व विज्ञान विभागांचे उपप्राचार्य अनुक्रमे प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, श्री. भीमराव पटकुरे, डॉ. हणमंतराव कणसे तसेच श्री. अरुण देव, श्री. अविनाश जोशी, श्री. अरविंद बोपर्डीकर व सौ. कांताबाई खडसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या व्याख्यानात सौ. जेरे पुढे म्हणाल्या, दारू, गुटखा, तंबाखू, मावा इत्यादींचे सेवन केल्याने ती व्यक्ती एकटी पडते. व्यसनाधीन व्यक्ती अडचणीत आली, तर तिला मित्रही मदत करत नाहीत. आजचा तरुण हा भविष्यकाळासाठी चेंज मेकर आहे. आपल्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तरुणांनी मन आणि मेंदू शाबूत ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या महापुरुषांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. नियमितपणे ध्यानधारणा केल्यास अनेक वाईट सवयींपासून आपण दूर राहू शकतो. व्यसनांपासून दूर राहून सर्वांनी ‘वाई पॅटर्न’ निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ. समीर पवार यांनी केले. भारत सेवा परिषदेच्या सचिव डॉ. रूपाली कदम यांनी परिषदेच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. झांबरे यांनी संयोजकांना धन्यवाद देऊन कार्यक्रमाची उपयुक्तता विशद केली. आमच्या महाविद्यालयाला नैतिक मूल्यांची महान परंपरा असून विद्यार्थ्यांनी वाईट व्यसनांपासून दूर राहून महाविद्यालयाचे नाव उंचावले पाहिजे असे सांगितले. भारत विकास परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद बोपर्डीकर यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे यांनी आभार मानले. तर एनसीसी कॅडेट कु. सिद्धी माने व सोनल पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment