महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये.
पर्यावरणस्नेहींनी गाठला २ लाखांचा टप्पा.
राज्यात पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक ४० टक्के प्रतिसाद.
*पुणे, दि. २७ डिसेंबर २०२४*: वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे प्रादेशिक विभागातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमध्ये तब्बल दोन लाखांचा टप्पा गाठला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ११३ वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे. तसेच 'गो-ग्रीन' योजनेमुळे या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ४० लाख १३ हजार ५६० रुपयांचा फायदा होत आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत ५ लाख २४५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे ४० टक्के प्रतिसाद पुणे प्रादेशिक विभागात मिळाला असून राज्यात महावितरणच्या १६ परिमंडलांमध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलामध्ये १ लाख ३४ हजार वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.
पर्यावरणात दिवसेंदिवस प्रतिकूल बदल होत आहे. त्यामुळे 'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज झाली आहे. पुणे प्रादेशिक विभागातील वीजग्राहकांचा सर्वाधिक प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद आहे. 'गो-ग्रीन'मधील ग्राहकांना 'ई-मेल' व 'एसएमएस'द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन ऑनलाइनद्वारे त्वरित वीज बिल भरणा करणे आणखी शक्य झाले आहे. लघुदाब वीजग्राहकांनी कागदी बिलांचा वापर बंद करून 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत 'गो-ग्रीन' योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ३६८ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांचा १ कोटी ७२ लाख ४ हजार १६० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. तर सातारा जिल्ह्यातील १३ हजार १५३ ग्राहकांना १५ लाख ७८ हजार ३६० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार २३१ ग्राहकांना १७ लाख ७ हजार ७२० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १८ हजार ४५ ग्राहकांना २१ लाख ६५ हजार ४०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ११ हजार ३१६ ग्राहकांना १३ लाख ५७ हजार ९२० रुपयांचा वीजबिलांमध्ये वार्षिक फायदा होत आहे.
'गो-ग्रीन' योजनेतून कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. 'गो-ग्रीन' मधील ग्राहकांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. त्याची गरजेनुसार केव्हाही प्रिंट काढता येईल. सोबतच वेबसाईटवर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. 'गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल अॅप किंवा www.mahadiscom.in वेबसाईट येथे सुविधा उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment