वाशीम जिल्ह्यात ‘बी फ्रँक’ उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी: २००० + विद्यार्थ्यांचा सहभाग.00000
वाशीम जिल्ह्यात ‘बी फ्रँक’ उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी: २००० + विद्यार्थ्यांचा सहभाग.
--------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर.
--------------------------------------
वाशिम : विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणीला चालना देण्यासाठी तसेच त्यांना स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने विद्यादान सहाय्यक मंडळ (VSM) अंतर्गत ‘बी फ्रँक’ उपक्रमाचा यशस्वी विस्तार वाशीम जिल्ह्यात करण्यात आला. जिल्ह्यातील १४ शाळांमध्ये २००० हून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे सशक्त करण्यात आले. या उपक्रमासाठी साक्षी लबडे, ओम नवले, हर्षल सोनोणे, श्रीकांत फुगणर, अनुष्का कदम, शुभम चव्हाण, विपुल नागरे , योगिता राखडे,संतोष आंभोरे, सतीश अघव,अतुल राऊत या विद्यादानच्या सहकाऱ्यांचा संघ कार्यरत होता.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोल काढण्याची कृती या उपक्रमाने विद्यार्थ्यांना सातत्य, सराव आणि स्वतःच्या मार्गाने यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी स्वप्नांच्या दिशेने दृढ राहण्याचे धडे घेतले. मूकनाट्य सादरीकरण सामाजिक समस्यांवर आधारित मूकनाट्याद्वारे विद्यार्थ्यांना शांतपणे आव्हानांवर मात करण्याचे महत्त्व शिकवले गेले. प्रेरणादायक कथा अरुणिमा सिन्हा यांच्या अद्वितीय संघर्षगाथेने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मकता आणि धैर्य राखण्याची प्रेरणा दिली. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विद्यादान सहाय्यक मंडळ (VSM) च्या विविध शिष्यवृत्ती, इंग्रजी शिक्षण, मुलाखत तयारी, वर्कशॉप आणि वैयक्तिक कौशल्य विकासाच्या संधींबद्दल माहिती देण्यात आली. गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांनी या संसाधनांचा लाभ घ्यावा आणि जिल्यातील इतर गरजू विद्यार्थी, मित्र, आणि नातेवाईकांना त्याबद्दल माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
‘बी फ्रँक’ उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने प्रेरणा दिली आहे. विद्यादान सहाय्यक मंडळचे अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी नक्कीच प्रेरक ठरतील.
Comments
Post a Comment