उचगावात किरकोळ कारणावरून बांधकाम कामगारांच्यावर तरुणांचा तलवार हल्ला ; तीन जण जखमी.
उचगावात किरकोळ कारणावरून बांधकाम कामगारांच्यावर तरुणांचा तलवार हल्ला ; तीन जण जखमी.
-----------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------
कोल्हापूर हुपरी रस्त्यावर उचगाव ता करवीर येथे एका मोठ्या हॉटेल समोर शिवगंगा कॉलनी जवळ चालू असलेल्या बांधकामाच्या साईटवर किरकोळ कारणावरून सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने तलवारी , लोखंडी रॉड व धारधार शस्त्राने हल्ला केला .यात तीघेजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
आकाश प्रकाश काळे वय २१, रजत रमेश काळे वय २५ व अमित चव्हाण (तिघेही रा.शांतीनगर उचगाव पूर्व) अशी तिघा जखमींची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून क मिळालेली अधिक माहिती अशी, कोल्हापूर हुपरी रस्त्यावर एक माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांची बांधकाम साईट चालू आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास विक्रम नगर तसेच परिसरातील दोन तरुण येऊन बांधकामावरील बांबू मागत होते. यातून त्यांचा बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांच्या बरोबर वाद झाला. यानंतर तुम्हाला बघून घेतो असे म्हणून ते दोघे तरुण तिथून निघून गेले. यानंतर काही वेळाने त्या दोघा तरुणांसह सात ते आठ जण हातात तलवारी, लोखंडी रॉड व धारदार शस्त्रे घेऊन आली आणि त्यांनी हल्ला चढवला. यात आकाश काळे याच्या पाठीवर व डोक्यावर सहा ते सात वार झाले असून तो गंभीर जखमी झाला.अन्य दोघेजण किरकोळ जखमी आहेत. बांधकामावरील इतरांनी या तरुण टोळक्याला पेटाळून लावल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. सशस्त्र हल्ला करणारे तरुण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. या घटनेची माहिती मिळतात करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षिरसागर तसेच गांधीनगर सपोनि डॉ. सागर वाघ यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व गांधीनगर पोलिसांची पथके संशयित हल्लेखोरांना पकडण्यासाठी रवाना झाली आहेत. याबाबत गांधीनगर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.
दरम्यान संशयित आरोपींची दोन नावे निष्पन्न झाली असून दोघेही रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे समजते. तर अन्य संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी जलद चक्रे फिरविली आहेत.
याबाबत अधिक तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ करीत आहेत.
फोटो
हल्ल्यातील जखमी तरुण
Comments
Post a Comment