स्क्रॅप व्यावसायिकाने केली तीन कोटींची फसवणूक.
स्क्रॅप व्यावसायिकाने केली तीन कोटींची फसवणूक.
--------------------------------
शिरोली प्रतिनिधी
अमीत खांडेकर
----------------------------------
हि रक्कम आणखी ही जास्त असणेची शक्यता असून GST बिले नसलेले काही व्यापारी तक्रारी साठी पुढे येण्यास तयार नाहीत
स्क्रॅप देण्याच्या अटीवर सुमारे तीन कोटींची रक्कम घेऊन फिरोज अहमद ऊर्फ बबलू खान रा.पुलाची शिरोली याने व्यापाऱ्यांना चुना लावून पलायन केले आहे. यामुळे शिरोली एमआयडीसीतील स्क्रॅप व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वी खान आपल्या कुटुंबियांसमवेत घराला कुलूप लावून पसार झाला आहे. त्याने मोबाईल बंद केल्याने त्याच्याशी व्यवहार केलेल्या व्यावसायिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शनिवारी थेट शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले आहे. पोलिसांनी गेली दोन दिवस फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच अर्जातील रकमेची पडताळणी सुरू केली आहे. याबाबत शनिवारी काही व्यावसायिकांनी एकत्रित येऊन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अर्जाद्वारे खान विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे शिरोली पोलिस ठाण्याचे एक दुय्यम दर्जाचे अधिकारी आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तींची चौकशी करीत आहेत.
याबाबत माहिती अशी की, बबलू खान हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे.गेली बरीच वर्षे तो कामानिमित्त शिरोलीत वास्तव्यास होता. काही स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने तो स्क्रॅप व्यवसायात आला. त्याचा आर्थिक व्यवहार, कामाची पद्धत आणि स्क्रॅपची देवाण घेवाण यामुळे त्याची व्यापाऱ्यांना भुरळ पडली होती. त्यामूळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी त्याच्याशी उलाढाल केली. सुरूवातीला बबलू खानने आर्थिक व्यवहार चांगला ठेवला,तसेच व्यापाऱ्यांना चांगला दर देऊन नफा मिळवून दिला. यातून त्याने पुलाची शिरोली येथील एकता कॉलनी मध्ये जागा घेऊन मोठी इमारत बांधली. या इमारतीवर त्याने शिरोलीतील एका नामांकित पत संस्थेचे मोठे कर्ज उचलले आहे. हे कर्जही आता थकित आहे. संबंधित संस्थेने त्या बंगल्याच्या दरवाजावर कर्जाची नोटीस लावली आहे. आहे. पण खान अचानक गायब झाल्याने अनेकांची झोप उडाली आहे.
त्याचा शोध घेऊन वसुली होईलच याची सध्यातरी खात्री नाही. पोलीस या सर्व प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी करतील आणि सत्य लवकरच बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. या फसवणूक प्रकरणात आणखीन बऱ्याच व्यापाऱ्यांचा समावेश आहे.त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.याबाबत तपास अधिकारी यांना विचारले असता तपास सुरू आहे! अर्जदारान नमूद केलेली रक्कम याबाबत खातरजमा केली जात आहे.त्यानंतर रितसर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment