कोल्हापूर जिल्ह्यात नवीन दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित.

कोल्हापूर जिल्ह्यात नवीन दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित.

आळते प्रकल्पातून १९१९ तर सातवे प्रकल्पातून १३२४ शेतकऱ्यांना मिळतेय  दिवसा वीज.

जिल्ह्यातील चार प्रकल्पातून ५२४९ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध.

*कोल्हापूर दि. ०६ मार्च २०२५:* शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील तिसरा प्रकल्प सातवे (ता.पन्हाळा) येथे तर चौथा प्रकल्प आळते (ता. हातकणंगले) येथे कार्यान्वित झाला आहे. या दोन्ही प्रकल्पांची यशस्वी चाचणी नुकतीच पूर्ण झाली असून यामुळे जिल्ह्यात कार्यान्वित प्रकल्पांची संख्या चार झाली आहे. या चार प्रकल्पातून एकूण ५२४९ शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे.  


राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात सातवे येथील उपकेंद्रास जोडलेल्या सातवे या चार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पातून सावर्डे कृषी वाहिनीवरून ७३०, मोहरे कृषी वाहिनीवरून ३९३ तर सातवे कृषी वाहिनीवरून २०१ शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. तर हातकणंगले येथील उपकेंद्रास जोडलेल्या आळते या चार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पातून आळते कृषी वाहिनीवरून १४१८ शेतकऱ्यांना व निमशिरगाव कृषी वाहिनीवरून ५०१ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. जिल्ह्यात किणी (ता. हातकणंगले) व हरोली (ता. शिरोळ) येथे यापूर्वीच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून यातून अनुक्रमे १२१६ व ७९० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. 


*कोल्हापूर जिल्ह्यात ५३ प्रकल्प प्रस्तावित* 


मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता १७० मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ४८ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.


*सौर प्रकल्प उभारणीत जिल्हा प्रशासनाचे सहकार्य*


मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व भूमी अभिलेख कार्यालय व पोलीस प्रशासन यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. 


*सौर प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करा – महावितरण*


वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच या प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रकल्प सुरु झाल्या पासून पहिले तीन वर्षे पाच लाख अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी सबंधित ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.


*सोबत फोटो-  आळते (ता. हातकणंगले) येथील सौर प्रकल्पाचा फोटो*

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.