कचरा कोंडाळ्यात महिलेचा मृतदेह सापडला,अपघात की घातपात याबाबत संभ्रम.
कचरा कोंडाळ्यात महिलेचा मृतदेह सापडला,अपघात की घातपात याबाबत संभ्रम.
------------------------------
शिरोली प्रतिनिधी
अमीत खांडेकर
------------------------------
आज शुक्रवार दि.१८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्त्यालगत असणाऱ्या कचरा कोंडाळ्यात एका महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे बेंगलोर महामार्गांवर नागाव येथील महिंद्रा शोरूम शेजारी सेवा रस्त्यालगत कचरा कोंडाळ्यात मुक्ता मारुती मोरे,अंदाजे वय - 65 सध्या रा.शिरोली हायस्कूल समोर,पुलाची शिरोली मूळ.रा.पुणे या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.या घटनेने शिरोली, नागाव परिसरात एकच खळबळ उडाली. या ठिकाणाहून जाणाऱ्या वाटसरूंना एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मुतदेह निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ स्थानिक लोकांना याची कल्पना दिली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तात्काळ पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड हे फौजफाट्यासह दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली,आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात असल्याचे त्यांनी सांगितले.हा अपघात पहाटे घडला असण्याची शक्यता आहे.एकतर अज्ञात वाहनाने उडविले असल्याची शक्यता आहे किंवा सदर महिला झोपेत चक्कर येऊन डीवायडर वर पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यांनी श्वान पथकास पाचारण केले. घटनास्थळी श्वान फिरविले असता तिथेच घुटमळले.शिरोली ग्रामपंचायत ची रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी सीपीआर येथे पाठविण्यात आला. या महिलेच्या चेहऱ्यावर व हातावर खोलवर जखमा असल्याने संभ्रम वाढला आहे.अपघात की घातपात हे कोडे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर समजेल.
सदरची महिला पुलाची शिरोली येथे भाड्याने राहत असल्याचे समजते.आठ दिवसांपूर्वी तिला घरमालकाने खोलीतून बाहेर काढले होते.त्यामुळे ती बाळूमामा मंदिर समोरच्या झाडाखालीच झोपत होती. ही महिला अर्ध मनोरुग्ण असल्याचे देखील समजते. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Comments
Post a Comment