बरगेवाडी कौलव येथे घोड्याचा मृत्यू; पिलाचा हृदयद्रावक संघर्ष.
बरगेवाडी कौलव येथे घोड्याचा मृत्यू; पिलाचा हृदयद्रावक संघर्ष.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
बरगेवाडी कौलव येथील लोखंडी पुलाजवळ मुसळधार पावसाने एका घोड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत घोड्याला उठवण्यासाठी त्याच्या लहान पिलाने केलेल्या केविलवाण्या प्रयत्नांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
यावर अधिक माहिती अशी की जोरदार पावसात अचानक कोसळल्याने या घोड्याचा जागीच मृत्यू झाला. घोड्याच्या मृत्यूने अनभिज्ञ असलेले त्याचे लहान पिलू, आपल्या आईला उठवण्यासाठी अक्षरशः धडपड करत होते. सुमारे पाच तास ते निष्पाप शिंगरू आपल्या मृत मादीला उठवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, तिला ढुसण्या मारत होते, तिच्याभोवती फिरत होते. रस्त्यावरून जाणारे अनेक प्रवासी हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून थबकले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, ते आपल्या जोडीदारावर आणि पिलांवर निरपेक्ष प्रेम करतात, याची प्रचिती या दृश्यातून अनेकांना आली.
घोड्याच्या मालक, एका धनगराला, या घटनेची माहिती मिळताच त्याच्या डोळ्यात पाणी आले. अनेक वर्षे आपल्या आयुष्याचा भार वाहून नेणारा, लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतचा सोबती असलेला घोडा गमावल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. या घटनेने माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
फोटो
कौलव बरगेवाडी दरम्यान रस्त्यावर मृत पावलेल्या मादी घोड्याला उठविण्यासा प्रयत्न करत असताना त्याचे पिलू
Comments
Post a Comment