आमदार देवराव भोंगळे यांची मध्यस्ती फळाला; पालगाव रस्ता आंदोलनाला यश.
आमदार देवराव भोंगळे यांची मध्यस्ती फळाला; पालगाव रस्ता आंदोलनाला यश.
---------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------------
▪️अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने स्वीकारल्या मागण्या; ३० मे पर्यंत काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन.
▪️कामगार बांधवांच्याही समस्या निकाली निघणार.
▪️अल्ट्राटेक नरमले.
कोरपना दि. ०७
मागील तिन दिवसांपासून सुरु असलेल्या पालगाव (ता. कोरपना) येथील ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनापुढे अखेर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रशासन नमले आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या रस्त्याच्या मागणीला यश आले असून, येत्या ३० मे पर्यंत पालगाव-मुख्य रस्ता कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन कंपनी प्रशासनाने लेखी पत्रात दिले आहे.
रखरखत्या उन्हात आणि अवकाळी पावसात तीन दिवस चाललेल्या या आंदोलनात राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी सक्रिय सहभाग घेत ग्रामस्थांच्या मागण्यांना बळ दिले होते.
कोरपना तालुक्यातील पालगाव येथील ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या आवाळपूर प्लान्टकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीची व डांबरीकरणाची मागणी करत होते. या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने ग्रामस्थांना विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा निवेदने देऊनही अल्ट्राटेक कडून दखल घेतली जात नसल्याने अखेर ग्रामस्थांनी सोमवार, ५ मे २०२५ पासून कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांनी लागलीच आंदोलन स्थळ गाठून आंदोलनकर्त्यांसह कंपनीविरुद्ध हुंकार फुंकला. त्यांनी रात्री कार्यकर्त्यांसह तेथेच सामुहिक भोजनही केला.
मंगळवारी, दि. ६ मे रोजी आंदोलनस्थळी महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये कामगारांचाही समावेश होता. कंपनी प्रशासनाच्या विरोधात कामगारांमध्येही असंतोष होता. आमदार देवराव भोंगळे यांनी कोणत्याही कामगार बांधवांनी कामावर न जाता आपल्या न्याय्य मागण्यांसह आंदोलनास पाठिंबा द्यावा अशी विनंती केली, त्यानुसार कामगारांनी कामावर न जाऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला. कंपनी प्रशासनाला आपल्या मागण्या लेखी स्वरूपात देत आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात कंपनी प्रशासनाशी चर्चा केली. ग्रामस्थांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. चर्चा अर्ध्यावर आल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागण्यांवर होकार दर्शविला. परंतू पुन्हा घुमजाव करीत मागण्यांसंदर्भात नकारात्मकता दर्शविली.
परंतू आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी मागे न हटण्याची भुमिका घेतली. तीन दिवसांच्या आंदोलनाची तीव्रता आणि आमदार भोंगळे यांची मध्यस्थी लक्षात घेऊन अखेर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. आज (बुधवारी) सायंकाळी कंपनीचे अधिकारी आणि आमदार देवराव भोंगळे व आंदोलक ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर पालगाव रस्त्याच्या कामाला येत्या ३० मे २०२५ पर्यंत प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल तसेच कामगारांच्याही न्याय्य मागण्या निकाली काढू असे लेखी आश्वासन अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले तीन दिवसांपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले. या यशस्वी आंदोलनामुळे पालगाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि शांततापूर्ण आंदोलनाचे कौतुक केले तसेच कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आंदोलनाच्या यशस्वी सांगतेनंतर आमदार देवराव भोंगळे यांनी सर्वांसह दुचाकीने पालगाव येथे जाऊन आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांचेसमवेत उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, नायब तहसीलदार प्रवीण चिडे, ठाणेदार शिवाजी कदम,पालगावचे सरपंच अरूण रागीट, अल्ट्राटेकचे व्यवस्थापक नमित मिश्रा, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, गडचांदूर शहर अध्यक्ष अरविंद डोहे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, नांदा शहर अध्यक्ष संजय नित, भाजपा महिला मोर्चा जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, संदीप शेरकी, सुनील उरकुडे, वामन तुराणकर, शहर महामंत्री रवी बंडीवार, कैलाश ताकसांडे, पुरूषोत्तम निब्रड, युवा मोर्चा तालुका महामंत्री विशाल अहिरकर, दिनेश ढेंगळे, सचिन आस्वले, रोहन काकडे, पवनदीप यादव, हितेश चव्हाण, अमोल गोरे, नरेंद्र मडावी, अनिल आत्राम, संदीप आंबटकर, आकाश रागीट, प्रकाश कुमरे, जतिन राठोड, अल्ट्राटेकचे एन. डी. तिवारी, सवदीप घोष, सतीश मिश्रा, सुराणा यांचेसह पालगाव वासीयांची मोठी उपस्थिती होती.
Comments
Post a Comment