विनापरवाना जळाऊ लाकूड वाहतूक प्रकरण : पिराचीवाडी रोडवर ट्रक जप्त; सुमारे २.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

विनापरवाना जळाऊ लाकूड वाहतूक प्रकरण : पिराचीवाडी रोडवर ट्रक जप्त; सुमारे २.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत. -------------------------------------------------- राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे ----------------------------------------------------- राधानगरी प्रादेशिक वनविभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कसबा वाळवे येथील पिराचीवाडी रोडवरील साळोखेनगर कोपऱ्याजवळ छापा टाकून विनापरवाना जळाऊ लाकूड वाहतूक करणारा ट्रक (क्रमांक MH-09 BC 5453) जप्त केला. या कारवाईत सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात होती. पळशिवणे येथील ट्रकचालक युवराज संभाजी पोवार यांनी चौकशीत वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे कबूल केले. याप्रकरणी वनविभागाने विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ट्रकसह सर्व मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई सुरू केली आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.